२३ दिवस पाळत ठेवून पकडलेल्या चोरट्याकडून २२ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 03:17 PM2021-05-28T15:17:40+5:302021-05-28T15:21:18+5:30
फायनान्स कंपनीची दुचाकी असल्याची थाप मारून विक्री करीत
औरंगाबाद : शहरातील जामा मशिद, शहागंज भाजी मंडी या गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरीचे प्रकार वाढल्याचे लक्षात आल्यावर सिटीचौक पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी तब्बल २३ दिवस पाळत ठेवली. पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले व एका चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. त्याने २२ दुचाकी चोरल्याचे सांगून त्या गाड्या विक्री करण्यासाठी त्याच्या साथीसाराकडे दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी सिल्लोड तालुक्यात जाऊन त्याच्या साथीदाराला पकडले आणि त्याच्याकडून २२ दुचाकी हस्तगत केल्या.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोऱ्या वाढल्या आहेत. पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी वाहन चोरीच्या वेळा आणि ठिकाणांचा अभ्यास केला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सिटीचौक पोलिसांनी शहागंज भाजीमंडी, कॅन्सर हॉस्पिटल आणि जामा मशिद परिसरात साध्या वेशातील ६ पोलीस तैनात केले. चोरट्यांना संशय येऊ नये यासाठी पोलीस असे लिहिलेल्या दुचाकीचा वापर त्यांनी टाळला. बहुतेक वाहनचोऱ्या सकाळी ७ ते दुपारी २ या कालावधीत झाल्या होत्या. रमजानमध्ये या तिन्ही ठिकाणी गर्दी असायची. याचाच लाभ घेऊन चोरटा दुचाकी पळवित होता. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामुळे त्याची चेहरेपट्टी पोलिसांना माहिती होती. छुप्या पहाऱ्याच्या २३ व्या दिवशी शहागंज भाजीमंडीत सकाळी एक जण मोबाईलवर बोलत दुचाकीला चावी लावत होता. त्याने दोन दुचाकींना चाव्या लावल्या, परंतु त्यांचे कुलूप उघडले नाही. त्यामुळे तो तिसऱ्या दुचाकीला चावी लावून फिरवत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. ठाण्यात नेऊन कसून चौकशी सुरू करताच त्याने त्याचे नाव गौसखा काले खॉ पठाण (ह. मु. ब्रीजवाडी, मूळ रा. नाणेगांव , ता. सिल्लोड ) असे सांगितले. मी दुचाकी चोरून साथीदार नवाब खॉ उस्मानखॉ पठाण (३०, रा. गोद्री, ता. भोकरदन) याला नेऊन देतो. नवाबखॉ चोरलेल्या दुचाकी विक्री करतो, अशी कबुली त्याने दिली.
नंबर प्लेट, सीट कव्हर बदलायचे
आरोपी चोरलेल्या दुचाकीची नंबर प्लेट काढून त्यावर बनावट क्रमांक टाकत. दुचाकीचे जुने सीट कव्हर काढून रंगीबेरंगी सीट कव्हर टाकणे, रेडियमचे पट्टे लावून ते दुचाकीचा चेहरामोहरा बदलत.
फायनान्स कंपनीची दुचाकी असल्याची थाप मारून विक्री करीत
आरोपी नवाबखॉ हा त्याच्या गावातील आणि पंचक्रोशीतील शेतकरी, मजूर यांना फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या दुचाकी असल्याची थाप मारून २० ते २५ हजारांत दुचाकी विक्री करायचा. ७५ ते ८० टक्के रक्कम आधी घेऊन उर्वरित रक्कम गाडीची कागदपत्रे देताना द्या असे सांगायचा. पोलिसांनी नवाबखॉला अटक केली. यानंतर त्याने सिल्लोड आणि भोकरदन तालुक्यात विक्री केलेल्या २२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
यांनी केली कामगिरी
पोलीस निरीक्षक संभाजी पवार, भंडारे , फौजदार के. डी. महाडुळे, कर्मचारी खैरनार, संजय नंद, माजीद पटेल, देशराज मोरे आणि संतोष शंकपाळ.