देवाई पतसंस्थेत २२ कोटींचा घोटाळा, चौकशीसाठी आलेला सीईओ अटकेत
By सुमित डोळे | Published: November 28, 2023 07:52 PM2023-11-28T19:52:26+5:302023-11-28T19:52:46+5:30
प्रत्येक व्यवहारात सह्यांचे सबळ पुरावे, सहा दिवसांची कोठडी
छत्रपती संभाजीनगर : देवाई महिला नागरी सहकारी पतसंस्थेत सप्टेंबर महिन्यात २२ कोटींचा घोटाळा समोर आला. तेव्हापासून अध्यक्ष मीना महादेव काकडे व कार्यकारी संचालक महादेव अच्युतराव काकडे हे पसार झाले. या प्रकरणी अनेक दिवसांपासून चौकशी सुरू असलेले अरुण दत्तूपंत पूर्णपात्रे (५३, रा. म्हाडा कॉलनी, सिडको) हे सोमवारीही आयुक्तालयात चौकशीसाठी गेले. ही चौकशी पूर्ण होताच पथकाने दुपारी पूर्णपात्रे यांना अटक केली.
जून २०२१ मध्ये मीना काकडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मीना यांनी पुढे पती महादेव यांनाच कार्यकारी संचालक केले. मात्र, उर्वरित समिती सदस्य व पदाधिकारी नियुक्त केलेच नाहीत. कुठलीही कागदपत्रे, पडताळणी न करता कर्जाची खिरापत वाटत गेले. त्याच्या वसुलीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. अन्य बँकेत ८ कोटींची संस्थेची गुंतवणूक दाखवून ती देखील परस्पर हडप केली. बनावट कागदपत्रांच्या आधारे विनातारण १३ कोटी ८३ लाख ८९ हजारांचे कर्ज उचलले. तसेच ३१ मार्च २०२३ रोजी के. एम. के. प्रा. लि. नावे २ कोटी १० लाख व १ कोटीचे अशी दोन कर्ज घेऊन रक्कम काढून घेतली. या कर्जासाठीचे अर्जही अर्धवट लिहिलेले आढळले. असा एकूण २१ कोटी ९१ लाख १४ हजार ७५२ रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच काकडे दाम्पत्याने पोबारा केला.
परदेशात गेल्याचे पुरावे नाही
२९ सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक सुरेश थोरात या प्रकरणी तपास करत होते. संचालक मंडळ, सचिव, सदस्यांची चौकशी सुरू होती. पूर्णपात्रे यांच्या बहुतांश सर्वच निर्णयांवर सह्या आहेत. दरम्यान, काकडे दाम्पत्य विदेशात पळून गेल्याची जोरदार चर्चा होती. संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून त्यांच्या प्रवासाविषयी माहितीही मागवली होती. मात्र, अद्याप ते विदेशात गेल्याचे रेकॉर्ड मिळाले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
सोमवारी पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक अरूण पूर्णपात्रे (रा. म्हाडा कॉलनी) यांना अटक केली असून, त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेेवण्याचे आदेश सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी दिले आहेत. पोलिसांनी यापूर्वी पतसंस्थेचे लेखापाल रावसाहेब चौथे यांना अटक केली होती. संचालकांनी स्वतःच्या संस्थांना बेकायदा १३ कोटी ८३ लाख ७९ हजार १०१ रुपयांचे कर्ज देऊन आयसीआयसीआय बँकेत ८ कोटींची एफडी केल्याचे ताळेबंदात दाखवून तब्बल २१ कोटी ९१ लाख १४ हजार ७५२ रुपये परस्पर हडप केल्याबाबत संचालक मंडळ, व्यवस्थापक, अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात २९ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.