प्रोझोन मॉलमध्ये गाळा देण्याचे आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:42 PM2019-06-08T23:42:51+5:302019-06-08T23:43:19+5:30
प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुकानाचा ताबा दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
औरंगाबाद : प्रोझोन मॉलमध्ये दुकान (गाळा) देण्यासाठी २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेऊन करार केल्यानंतर दुकान न देता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे २०१२ साली हा करार केला, तेव्हापासून कालपर्यंत आरोपींनी दुकानाचा ताबा दिला नाही आणि पैसेही परत केले नाहीत.
सुनील अनुपेंद्रनाथ चतुर्वेदी, अखिल चतुर्वेदी, दीप सुभाष गुप्ता, निगम अनिलभाई पटेल, प्रतीक प्रकाश देसाई आणि त्याचे प्रतिनिधी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार प्रमोदकुमार बगेश्वरनाथ रॉय हे नवी दिल्ली येथील रहिवासी असून, ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांनी २०१२ मध्ये प्रोझोन मॉलमध्ये गाळा खरेदीसाठी आरोपींसोबत करार केला होता. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडून गाळ्याची किंमत म्हणून २२ लाख १३ हजार ५०० रुपये घेतले. ही रक्कम घेतल्यानंतर मुदतीत गाळ्याचे बांधकाम करून प्रमोदकुमार यांच्या ताब्यात देणे हे आरोपींना बंधनकारक होेते. असे असताना आरोपींनी मात्र गाळ्याचे बांधकाम मुदतीत केले नाही. एवढेच नव्हे तर त्यांना गाळाही दिला नाही. यामुळे प्रमोदकुमार यांनी आरोपींकडे त्यांचे पैसे परत मागितले. त्यानंतर ते वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. यात करार होऊन सात वर्षे उलटल्यानंतरही आरोपी आपल्याला गाळा देत नाहीत आणि पैसेही परत करीत नाहीत, हे प्रमोदकुमार यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला. हा अर्ज चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अर्जाची चौकशी केली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या रिपोर्टनंतर ७ जून रोजी प्रमोदकु मार यांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक मीरा लाड तपास करीत आहेत.