शिवसेना समर्थक २२ नगरसेवक सहलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:18 AM2017-10-22T01:18:52+5:302017-10-22T01:18:52+5:30
महापौर, उपमहापौर निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, शिवसेनेने कोणताच धोका न पत्करता अपक्षांची मोट अत्यंत यशस्वीपणे बांधली असून, तब्बल २२ सेना समर्थक नगरसेवकांना शुक्रवारी थेट सहलीवर पाठवून देण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौर, उपमहापौर निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, शिवसेनेने कोणताच धोका न पत्करता अपक्षांची मोट अत्यंत यशस्वीपणे बांधली असून, तब्बल २२ सेना समर्थक नगरसेवकांना शुक्रवारी थेट सहलीवर पाठवून देण्यात आले. सेनेचे नगरसेवकही २५ आॅक्टोबरला सहलीवर रवाना होणार आहेत. सेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपमध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने कमालीची शांतता पसरली आहे. आपले नगरसेवक सहलीवर पाठवायचे किंवा नाही याबाबत भाजप मौन बाळगून आहे.
महापौर, उपमहापौर निवडणूक २९ आॅक्टोबर रोजी घेण्यात येणार असून, २५ दिवस आधीच महापौरपदाचा उमेदवार जाहीर करून सेनेने या निवडणुकीत जोरदार आघाडी घेतली. ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार घोडेले यांना उमेदवारी देऊन सेनेने अनेकांची कोंडी करून टाकली. भाजपमधील इच्छुकांच्या तोंडचे पाणीच पळाले. यानंतर भाजप स्वबळावर महापौर निवडणूक लढविणार अशी भाषा करण्यात येऊ लागली. हा सर्व प्रकार अत्यंत संयमाने घेत सेनेने कोणतेच राजकीय अस्त्र बाहेर काढले नाही. भाजपचा आकडा ३६ पेक्षा अधिक वर जातच नव्हता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर निवडणूक स्वबळावर न लढता सेनेला पाठिंबा देण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला बायपास करण्याची हिंमत अजून भाजपच्या कोणत्याच पदाधिकाºयांमध्ये नाही.