महापालिकेत तब्बल २२८७ पदे रिक्त; सध्या भरती नसल्याने दलालांपासून रहा सावध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 04:57 PM2021-09-20T16:57:32+5:302021-09-20T17:01:36+5:30
महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही.
औरंगाबाद : महापालिकेत रिक्त पदांचा अनुशेष दर महिन्याला हळूहळू वाढतोय. नवीन आकृतीबंधानुसार शासनाने महापालिकेला ५ हजार ७१९ पदांना मंजुरी दिली. सध्या महापालिकेच्या आस्थापनेवर ३ हजार ४३२ पदे भरलेली आहेत. २२८७ पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अर्ध्या कामकाजाची भिस्त असली तरी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विभागातील कामकाजावर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येते.
महापालिका प्रशासनाने मागील दोन दशकांपासून नवीन भरतीच केली नाही. दरवर्षी किमान ५० ते ६० अधिकारी- कर्मचारी निवृत्त होतात. रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. सध्या एका अधिकाऱ्याकडे किमान तीन ते चार विभागांचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे कोणतेही काम लक्षपूर्वक करता येत नाही. हे झाले अधिकाऱ्यांच्या बाबतीत. कर्मचारी निवृत्त झाला, तर त्याचा पदभार दुसऱ्या समकक्ष कर्मचाऱ्याकडे सोपविण्यात येत नाही. त्याच्या जागेवर दुसरा कर्मचारी येईल म्हणून त्याचे कामकाज तसेच गुंडाळून ठेवलेले असते. खूपच गरज असेल, तेव्हा एखादा-दुसरा कर्मचारी त्याचे काम करून घेतो. रिक्त पदांचा अनुशेष वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने खासगी एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेतले. हे कंत्राटी कर्मचारी कायमस्वरूपी नोकरी नसल्यामुळे ते स्वत: हित जोपासण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कार्यालयीन, फायलींसंदर्भातील जबाबदारीही प्रशासनाला सोपविता येत नाही. एखादा घोटाळा झाला तर कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई करता येत नाही.
हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग प्रकरण; विद्यापीठाचे पीआरओ संजय शिंदे निलंबित
आकृतीबंध, सेवा भरती नियम प्राप्त
मागील अनेक वर्षांपासून महापालिका प्रशासन शासनाकडून नवीन आकृतीबंध मंजूर करून घेण्यात व्यस्त होते. त्यानंतर आता शासनाकडून सेवा भरती नियमही प्राप्त झाले. अनेक पदांच्या बाबतीत सेवा भरती नियमात विसंगती असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद शासनाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जातेय.
सोशल मीडियावर भरतीही ओहोटी
महापालिकेत पाच हजार रिक्त पदांची भरती होणार म्हणून सोशल मीडियावर दोन दिवसांपासून मेसेज व्हायरल होत आहे. ही बाब खरी असल्याचे दाखविण्यासाठी आकृतीबंध, सेवा भरती नियमांचा आधार घेतला जातोय. वास्तविक पाहता महापालिकेने सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. भरतीच्या नावावर दलालांपासून सावधान राहावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
नवीन पदांचा गोषवारा
संवर्ग- मंजूर पदे- भरलेली पदे- रिक्त पदे
गट-अ- १४९-३८-१११
गट ब- ५८- ०९- ४९
गट क- २२०९- ८८८- १३२१
गट ड- ३३०३- २४९७- ८०६
हेही वाचा - हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू