जायकवाडी धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात विसर्गाचे यंदाचे २२ वे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2021 07:05 PM2021-09-29T19:05:21+5:302021-09-29T19:08:55+5:30
Jayakwadi Dam : स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत.
- संजय जाधव
पैठण : नाशिक जिल्ह्यातील धरण समूहावर भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात ( Jayakwadi Dam ) २००९ ते १६ दरम्यान सलग आठ वर्ष अपेक्षित जलसाठा न झाल्याने कपात करून पाणी वापरण्याची वेळ मराठवाड्यावर (Marathawada ) आली होती. परंतू गेल्या तीन वर्षापासून नाशिक पेक्षा स्थानिक पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने याच पावसावर जायकवाडी धरण मोठ्या प्रमाणावर भरल्याचे समोर आले आहे. बुधवारी जायकवाडी धरणातून विसर्ग करण्यात आला. सलगपणे तीन वर्ष धरणातून पाणी सोडण्याची धरणाच्या इतिहासातील ही तिसरी वेळ आहे.
स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत. धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात पाणी सोडण्याचे हे २२ वे वर्ष आहे. जायकवाडी धरणाच्या इतिहासात सुरवातीच्या काळात १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करावा लागला. दुसऱ्यांदा सन २००५ ते २००८ असा सलग चार वर्ष विसर्ग झाला. यानंतर सन २०१९ ते २०२१ असा सलग तीन वर्ष विसर्ग होत आहे.
१९७५ पासून विसर्ग...यंदाचे २२ वे वर्ष
जायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८" उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला गोदावरीला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला. यानंतर सन २००० ते २००५ असे सलग चार वर्ष धरणातून पाणी सोडले नाही. मात्र २००५ ते २००८ या दरम्यान सलग चार वर्षे पाणी सोडावे लागले. यानंतर पुढील आठ वर्षे २००९ ते २०१६ मोठे बीकट गेले या दरम्यान अपेक्षित जलसाठा न झाल्याने पाणी जपून वापरावे लागले. पुन्हा २०१७ ला पाणी सोडावे लागले यानंतरचे २०१८ पुन्हा कोरडे गेले. यानंतर मात्र २०१९ ते २०२१ सलग तीन वर्षांपासून धरणातून विसर्ग होत आहे.
२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटले...
सन २००० ते २०२१ या २२ वर्षाच्या काळात धरण ८ वेळेस भरले, दरम्यान १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८ या १४ वर्षात धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले. २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. २०२० ला तर धरणातून ८० टिएमसी पाणी सोडावे लागले. यंदाची सुरवात ४७१६० क्युसेक्स क्षमतेने बुधवारी करण्यात आली आहे.
१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर...
१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते.