रात्रीतून तब्बल २३ फूट उंच मोबाईल टॉवर उभारला; मनपाने कारवाई करून केले साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:27 PM2021-01-28T19:27:59+5:302021-01-28T19:30:19+5:30
महापालिकेला या अनधिकृत टॉवरची माहिती प्राप्त होताच अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने मोबाईल टावरचे साहित्य जप्त केले.
औरंगाबाद : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहेत. बाैद्धनगरात (जवाहरकॉलनी) एका घरावर रात्रीतून तब्बल २३ फूट उंच मोबाईल टॉवर उभारण्यात आला. महापालिकेला या अनधिकृत टॉवरची माहिती प्राप्त होताच अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने मोबाईल टावरचे साहित्य जप्त केले.
बाैद्धनगर येथे देविदास लहाने यांच्या घरावर एका रात्रीतून अनधिकृत मोबाईल टॉवर उभे करण्यात आले. तब्बल २३ फूट उंच टॉवर उभारण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिक अवाक् झाले. काही नागरिकांनी तातडीने महापालिकेत धाव घेतली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई केली. टॉवर उभारणाऱ्या कारागिरांकडूनच टॉवर आडवा करण्यात आला. काही साहित्य महापालिकेने जप्त करून आणले. यानंतर पुन्हा काम सुरू केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. ज्या इमारतीवर टॉवर उभारण्यात येत होते त्या इमारतीचे आयुष्य किती आहे, हेसुद्धा बघितल्या गेले नाही. अत्यंत कमकुवत इमारतीवर टॉवर उभारण्यात येत होते, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लक्ष्मण चावडी रस्त्यावर कारवाई
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सायंकाळी लक्ष्मण चावडी ते जाफर गेट या रस्त्यावरील अतिक्रमणे काढली. १५२ कोटी रुपयांच्या अनुदानातून हा रस्ता विकसित करण्यात येत आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर.एस. राचतवार, नगररचना विभागाचे शिवाजी लोखंडे, बोंबले, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, सागर श्रेष्ठ आदींनी कारवाई केली..