शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:02 AM2021-01-09T04:02:01+5:302021-01-09T04:02:01+5:30
शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम औरंगाबाद : आता ...
शहरात भविष्यात उभारतील २३ मजली इमारती
स्मार्ट सिटीच्या दिशेने : मनपा अग्निशमन दलास व्हावे लागेल सक्षम
औरंगाबाद : आता शहरात १० मजली इमारती दिसत आहेत; पण येत्या काळात या स्मार्ट सिटीत चक्क २३ मजली इमारती उभारल्या जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळेल, हे शक्य झाले आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या अधिसूचनामुळे या नियमावलीमुळे वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मिळणार असून, औरंगाबाद मनपा हद्दीत ७० मीटर उंचीपर्यंत म्हणजे २३ मजली इमारत बांधता येणार आहे. शहरात जुन्या इमारती पडून तिथे नव्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील. यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.
मुंबई, पुणे या मोठ्या शहरात आपण गगनचुंबी इमारती बघत असतो. तिथे फेरफटका मारून आलेल्या व्यक्तीस शहरतील इमारती ठेंगण्या वाटतात. आजघडीला शहरात १० मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, आता राज्यासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमुळे येथील नामांकित बांधकाम व्यवसायिक २३ मजली इमारती बांधण्यासाठी सरसावले आहेत. त्यादृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली आहे. रेखांकनामधील ‘ॲमिनिटी स्पेसचे’ प्रमाण पाच टक्के इतके प्रस्तावित केले आहे. त्यामुळे बांधकामास जादा जागा उपलब्ध होणार आहे. जुन्या शहरतील ६० ते ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारती पडून तिथे या उंच इमारती उभारल्या जाणार आहेत. अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आला असल्याने असे प्रकल्प ‘रिडेव्हलपमेंट’ करता येतील. शहराबाहेरही अशा २३ मजली इमारती उभारल्या जातील.
यात एफएसआय जास्त मिळाल्याने फ्लॅटच्या किमती नियंत्रणात येतील. यामुळे येत्या काळात जर शहरात किंवा आसपासच्या भागात गगनचुंबी इमारती उभारलेल्या दिसल्या तर नवल वाटायला नको.
करावे लागतील आग प्रतिबंधक उपाय
आग प्रतिबंधक उपायाशिवाय मंजुरी नाही
इमारतीची उंची ७० मीटरपर्यंत वाढणार आहेत. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापनचे नॅशनल बिल्डिंग कोडप्रमाणेच सर्व नियम पाळावे लागणार आहेत. त्याशिवाय बांधकामाचा नकाशा मंजूर होणार नाही.
चौकट
७० मीटरकरिता अग्निशमन दलास सक्षम होण्याची आवश्यकता
२३ मजली इमारतीला आग लागली तर त्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडे उंच शिडी, अत्याधुनिक यंत्रणा, तेवढे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे.
रवी वटटमवार
उपाध्यक्ष, महाराष्ट्र क्रेडाई