हायकोर्टाच्या आदेशानंतर २३ हजार मीटर केबल केले कट; ३० टक्के इंटरनेट ग्राहकांची सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 19:54 IST2022-12-01T19:53:42+5:302022-12-01T19:54:20+5:30
इंटरनेटचा वापर करणारे शहरात १ लाखाहून अधिक ग्राहक आहेत.

हायकोर्टाच्या आदेशानंतर २३ हजार मीटर केबल केले कट; ३० टक्के इंटरनेट ग्राहकांची सेवा बंद
औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील केबल कट करण्याची माेहीम मनपाकडून अधिक तीव्र करण्यात आली. बुधवारी, दुसऱ्या दिवशी २३ हजार ३७० मीटर केबल कट करण्यात आली. त्यामुळे शहरातील जवळपास ३० टक्के ग्राहकांचे इंटरनेट, केबल टीव्ही बंद पडल्या. इंटरनेट सेवा देणाऱ्या ऑपरेटर्स मंडळींमध्ये खळबळ उडाली असून, मनपानेच पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मंगळवारपासून मनपाने व्यापक प्रमाणात केबल काढण्याची मोहीम सुरू केली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव पथक, विद्युत विभाग, वॉर्ड अधिकारी यांच्या पथकामार्फत शहरातील झोन क्र १, ४ व ७ मध्ये कारवाई करण्यात आली. दिवसभरात २३ हजार ३७० मीटर केबल काढण्यात आली. आठवडाभर ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेनंतर अनधिकृत केबल टाकल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
या भागात केली कारवाई
महापालिकेच्या पथकाने सलीम अली सरोवर ते जैस्वाल हॉल, एम-२ ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा, हडको कॉर्नर ते जटवाडा रोड, उद्धवराव पाटील चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, सेव्हन हिल ते सुतगिरणी चौक ते शहानूर मियाँ पदर्गा रोड, सावरकर चौक, गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर रोड, गोकुळ स्वीट ते शिवाजीनगर, घासमंडी, मंजुरपुरा, गांधी पुतळा, टाकसाळी टॉवर, जुना बाजार ते भडकल गेट या भागातील केबल काढली.
केबल, इंटरनेट बंद
मनपाच्या कारवाईमुळे शहरातील हजारो टीव्ही कनेक्शन बंद झाले. त्याचप्रमाणे इंटरनेट ग्राहकांचीही मोठी गैरसोय झाली. हजारो नागरिकांना फटका बसला.
शहरात १ लाखांहून अधिक ग्राहक
इंटरनेटचा वापर करणारे शहरात १ लाखाहून अधिक ग्राहक आहेत. मागील दोन दिवसांत ३० टक्के ग्राहकांची सेवा बंद झाली आहे. शहरात १५ मोठे ऑपरेटर्स आहेत. लहान-लहान ऑपरेटर्सची संख्या ५० ते ७५ पर्यंत आहे. आम्ही एकत्र येऊन या कारवाईसंदर्भात चर्चा करणार आहेत. मनपाने आम्हाला रस्त्याच्या कडेला एक ठरावीक जागा उपलब्ध करून द्यावी, नेहमीसाठी हा विषय संपेल.
- आर.एस. छाबडा, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर.