रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2017 11:31 PM2017-03-28T23:31:25+5:302017-03-28T23:31:25+5:30
लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला
लातूर : जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला असून, त्यात २०१४-१५ मध्ये रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांवर मृत्यू ओढवला आहे तर अति रक्तस्त्राव झाल्याने १८.६ टक्के माता दगावल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या निरीक्षणामध्ये सरकारी व खासगी रुग्णालयांत गेल्या तीन वर्षांत एकूण ७९ गरोदर मातांवर मृत्यू ओढवला. २०१४-१५ मध्ये एकूण ५९ गरोदर माता दगावल्या. त्यात अति रक्तस्त्रावामुळे ११ मातांचा मृत्यू झाला. जंतू संसर्गामुळे ३ माता दगावल्या, तर गर्भपातामुळे २, बाळंतपणाला धोका झाल्याने १ तर रक्तदाबामुळे १४ आणि अन्य कारणांमुळे २७ अशा एकूण ५९ मातांचा मृत्यू झाला आहे. या सालात रक्तस्त्रावामुळे १८.६ टक्के, जंतू संसर्गामुळे ५.१ टक्के, गर्भपातामुळे ३.४, प्रसूतीला अडथळा १.७, रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू २०१४-१५ मध्ये झाला आहे. २०१५-१६ मध्ये एकूण ७ गरोदर माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे २, जंतू संसर्गामुळे १ व अन्य कारणांमुळे ४ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. २०१५-१६ मध्ये १३ माता दगावल्या असून, त्यात अति रक्तस्त्रावामुळे ३, जंतू संसर्गामुळे १, अन्य कारणांमुळे ९ अशा एकूण १३ मातांवर मृत्यू ओढवला. या सालात रक्त स्त्रावामुळे ८.५ टक्के, जंतू संसर्गामुळे २.८ आणि अन्य कारणांमुळे २५.६ टक्के मृत्यूचे प्रमाण राहिले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक यांनी दिली. (प्रतिनिधी)