शहरातील २४ मार्गांवर २४ शहर बस २४ तारखेपासून धावण्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:27 PM2019-01-09T12:27:19+5:302019-01-09T12:30:54+5:30
महापालिकेच्या शहर बससेवेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या शहर बससेवेला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. २३ बस शहरात लवकरच येणार असून, २४ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, असा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी केला.
२४ मार्ग निश्चित करून वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. २८ बसपैकी २४ बस रस्त्यावर धावतील. चार बस राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यापैकी एक बस शहर दर्शनासाठी वापरली जाईल. २४ बसमधून १३ बस शाळा-महाविद्यालय वेळापत्रकानुसार, तर ११ बस नागरिकांसाठी धावतील. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सिटीबस सोडण्यात येतील. सिडको, चिकलठाणा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय नियंत्रण कार्यालय, या चार ठिकाणी बस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सुरुवातीला मनपामध्ये ५ बस दाखल झाल्या. २३ बस मंगळवारी संध्याकाळपर्यंत दाखल होतील. एसटी महामंडळाकडून सुरू असलेली सिटीबस पूर्णपणे बंद करून त्याऐवजी मनपाची सिटीबस सुरू होणार आहे. त्याकरिता एसटी महामंडळासोबत अंतिम करार केला जाणार असून, ५० वाहक व चालकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
बसचे वेळापत्रक लावण्यासाठी ३७० पोल बसविले जातील. त्यासाठी १४ जानेवारीपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील. नियंत्रण कार्यालयासाठी रेल्वे स्टेशन रोडवरील पर्यटन कार्यालयामागील जागा, राखी टॉवरमागील जागा, आमखास मैदान, मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र हॉल यापैकी एक जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.
विविध घटकांसाठी आरक्षणाची सोय
सिटीबसमध्ये अंपगांसाठी चार सीट, स्वातंत्र्यसैनिक २, ज्येष्ठ नागरिकांसाठी २ सीट, तर महिलांसाठी चार सीट आरक्षित असणार आहेत.