राज्यात खासगी २४ संस्थांची होऊ शकतात समूह विद्यापीठे, उच्चशिक्षण विभागाचे प्रयत्न

By राम शिनगारे | Published: January 10, 2024 12:32 PM2024-01-10T12:32:02+5:302024-01-10T12:33:26+5:30

विद्यापीठांवरील ताण होणार कमी

24 private institutions in the state can become group universities, the efforts of the higher education department | राज्यात खासगी २४ संस्थांची होऊ शकतात समूह विद्यापीठे, उच्चशिक्षण विभागाचे प्रयत्न

राज्यात खासगी २४ संस्थांची होऊ शकतात समूह विद्यापीठे, उच्चशिक्षण विभागाचे प्रयत्न

राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: केंद्र सरकारने आणलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० नुसार राज्यात समूह विद्यापीठे स्थापन करण्याचा निर्णय उच्चशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यात २४ खासगी व्यवस्थापनांतर्गत असलेल्या महाविद्यालयांची समूह विद्यापीठे स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात चार समूह विद्यापीठे स्थापन होतील, अशी माहिती आहे.  त्यावर उच्चशिक्षण विभाग काम करीत असून, लवकरच शासकीय महाविद्यालयांचे समूह विद्यापीठ स्थापन करून कार्यान्वित केले जाणार आहे. त्यास उच्चशिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दुजोरा दिला आहे.

...तर चार समूह विद्यापीठे स्थापन होऊ शकतात

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, मौलाना आझाद शिक्षण संस्था आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थांसह शासकीय महाविद्यालयांची मिळून चार समूह विद्यापीठे स्थापन करण्याचा शासनाचा विचार आहे. मशिप्र मंडळाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनुदानित तीन, तर विनाअनुदानित ५ पेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या चार अनुदानित महाविद्यालयांसह एकूण ९ कॉलेजेस आहेत. 

विद्यापीठांची संख्या

  • १३ अकृषी 
  • २५ खासगी 
  • २५ अभिमत 
  • १ शासकीय समूह विद्यापीठ 
  • २ खासगी समूह विद्यापीठे   
  • सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ हे पहिले युनिटरी शासकीय विद्यापीठ ठरले आहे.


समूह विद्यापीठांच्या स्थापनेमुळे पारंपरिक विद्यापीठांवर येणारा ताण कमी होईल. समूह विद्यापीठे परिसरातील गरजेनुसार अभ्यासक्रमांची रचना, मांडणी करतील. परीक्षांमध्ये होणारे गोंधळ थांबतील. परीक्षांचे निकालही
वेळेवर लागतील.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्चशिक्षण विभाग

Web Title: 24 private institutions in the state can become group universities, the efforts of the higher education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.