जिल्ह्याकरिता २४०० शेततळ्यांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 12:31 AM2016-02-23T00:31:42+5:302016-02-23T00:31:42+5:30
बीड : अल्प पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखले आहे.
बीड : अल्प पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात सिंचन व्हावे या दृष्टिकोनातून राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण आखले आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक कार्यशाळा झाली. त्यात सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांना यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले.
पहिल्या टप्प्यात एकूण २४०० शेततळे करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनासमोर आहे. याबाबत सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामध्ये शेततळ्यासाठी लाभार्थींच्या पात्रतेसंबंधीही सांगितले. यामध्ये शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर (०.६० हेक्टर) जमीन असावी, लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्यासाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी; जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे अथवा पुनर्भरण करणे शक्य होईल. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायिक शेततळे आदी शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा, अशा अटींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यशाळेत अधिकाऱ्यांना सांगितले.
आजपासून अर्ज ‘डाऊनलोड’
ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात शेततळे तयार करायचे आहे, त्यांना २३ फेब्रुवारीपासून अर्ज डाऊनलोड करता येणार आहेत. शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)