मनमानी वसुली! औरंगाबादहून नागपूरसाठी सांगितले २,४००; प्रत्यक्षात २,७०० ते ३ हजार रु. भाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:17 PM2022-10-22T14:17:15+5:302022-10-22T14:18:19+5:30
प्रवासी म्हणतात, ‘सणाला गावी जायचे की तक्रार करीत बसायचे’
औरंगाबाद : ‘आरटीओ’ कार्यालयाने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी गुरुवारी विविध मार्गांवरील खासगी बसचे कमाल प्रवासीभाडे निश्चित करण्यात आले. यानुसार औरंगाबाद ते नागपूर बसचे कमाल भाडे २,४०० निश्चित करण्यात आले, प्रत्यक्षात या मार्गासाठी २७०० ते ३ हजार रुपये भाडे आकारण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालक आरटीओ कार्यालयाच्या भाडेदर निश्चितीला केराची टोपली दाखवीत असल्याची परिस्थिती आहे.
दरवर्षीप्रमाणे ऐन दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स चालकांनी भाडेवाढीचा दणका दिला आहे. एसटी महामंडळाच्या दीडपट भाडे घेण्याची ट्रॅव्हल्सला मुभा आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक मार्गांवर दुप्पट भाडे आकारण्यात येत आहे. एसटीबरोबरच ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या हंगामात मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे ट्रॅव्हल्स चालकांकडून मनमानी भाडेआकारणी होत असल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे आरटीओ कार्यालयाने बुधवारी ट्रॅव्हल्स चालकांची बैठक घेऊन नियमानुसार भाडे आकारणी करण्याची सूचना केली, तसेच आरटीओ कार्यालयाने खासगी बसचे कमाल प्रवासी भाड्याचे दर निश्चित केले, मात्र, अनेक मार्गांवर निश्चित केलेल्या कमाल दरापेक्षा अधिकचे भाडे आकारण्यात येत आहे.
नियमानुसार भाडे घेण्याची सूचना
ट्रॅव्हल्स चालकांना नियमानुसार भाडे घेण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, या उद्देशाने कमाल भाडेदर निश्चित करण्यात आला आहे. वसूल केलेली जादा रक्कम संबंधित प्रवाशांना परत करावी, अशाही सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना केली आहे.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी
...तर करा तक्रार
अधिक भाडे आकारण्याचा प्रकार होत असेल तर प्रवाशांना आरटीओ कार्यालयात त्यासंदर्भात तक्रार करता येते. मात्र, प्रवासाच्या गडबडीत, नसती कटकट नको म्हणून, बहुतांश प्रवासी अधिक भाडे आकारूनही तक्रार करीत नसल्याची परिस्थिती आहे. सणाला गावी जायचे की तक्रार करीत बसायचे, असा प्रश्न उपस्थित करीत मनमानी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओ कार्यालयाने कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली.
‘आरटीओ’ने केलेले खासगी बसचे दर निश्चिती मार्ग.......प्रतिप्रवासी कमाल भाडे
औरंगाबाद - मुंबई : १८०० औरंगाबाद - नागपूर : २४०० औरंगाबाद - चंद्रपूर : २९०० औरंगाबाद - सोलापूर : १५०० औरंगाबाद - लातूर : १३०० औरंगाबाद - पुणे : १२०० औरंगाबाद - कोल्हापूर : २२०० औरंगाबाद - सांगली : २२०० औरंगाबाद - यवतमाळ : १७०० औरंगाबाद - हिंगोली : ११०० (भाडे रुपयांमध्ये)