मराठवाड्यात २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:37 PM2018-11-17T17:37:16+5:302018-11-17T17:39:20+5:30
दोन वर्षांपूर्वी अवयवदानाची चळवळ सुरूझालेल्या मराठवाड्यात सध्या तब्बल २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत आहेत.
औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अवयवदानाची चळवळ सुरूझालेल्या मराठवाड्यात सध्या तब्बल २४५ रुग्ण ‘किडनी’च्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ७५ रुग्णांना यकृत, तर एकाला हृदय प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. तुलनेत अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अवयवांसाठी रुग्णांची ‘वेटिंग’ दिवसेंदिवस वाढत आहे.
औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यातील शेकडो रुग्णांच्या आयुष्यात उजाडलेली ही नवीन पहाट होती. २०१६ पासून आतापर्यंत मराठवाड्यात २१ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. यात १७ औरंगाबाद, ३ नांदेड आणि १ लातूर येथील अवयवदात्याचा समावेश आहे. अवयवदान केलेल्या २१ दात्यांचे ६७ अवयवांचे आणि २४ नेत्रांचे प्रत्यारोपण झाले. यामध्ये ३९ किडनी, १९ यकृत आणि ९ हृदय अशा अवयवांचे प्रत्यारोपण झाले. ४२ अवयवांचे प्रत्यारोपण फक्त औरंगाबादेत झाले आहे, तर २५ अवयव हे मराठवाड्यात पाठविण्यात आले. यातील दोन हृदयांचे चेन्नई येथे प्रत्यारोपण झाले.
फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण आणि २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण करून मराठवाड्याने नवीन इतिहास रचला. एकीकडे अवयवदान चळवळ वाढत आहे आणि दुसरीकडे मात्र अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. २४५ रुग्ण किडनी, ७५ रुग्ण यकृत व १ रुग्ण हृदयाच्या प्रतीक्षेत आहे. ही यादी कमी करण्यासाठी अवयवदानात वाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती विविध कार्यक्रम राबवीत आहे. तीन वर्षांत ५० जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
प्रत्यारोपण केंद्रांचीही गरज
बे्रनडेड रुग्णांच्या अवयवदानाच्या संख्येत वाढ होण्यासाठी प्रत्यारोपण व रिट्रिव्हल केंद्रही वाढविण्याची गरज आहे. मराठवाड्यात सध्या औरंगाबादेत ५, नांदेड येथे १ असे ६ प्रत्यारोपण केंद्र आहेत, तर औरंगाबादेत २, नांदेड येथे १, लातूर येथे १ आणि अंबाजोगई येथे १ अशी ५ रिट्रिव्हल केंद्र आहेत, अशी माहिती विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.