२४६ ग्रा.पं.त मग्रारोहयो ठप्प
By Admin | Published: June 22, 2017 11:19 PM2017-06-22T23:19:37+5:302017-06-22T23:23:58+5:30
हिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात२४६ ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत छदामही खर्च केला नाही. ग्रामपंचायतींचा १ लाख ७६ हजार कामांचा आराखडा प्रस्तावित केला असला तरीही प्रशासकीय औदासीन्य आणि मजुरांअभावी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनतेही एकही काम पूर्ण नाही.
हिंगोली जिल्ह्यात ५६९ ग्रामपंचायती आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींची मग्रारोहयोच्या कामांकडे पाठ आहे. विशेषत: वसमत तालुक्यात तर ८९ टक्के ग्रामपंचायती ही कामेच करायला तयार नाहीत. यात औंढ्यात १0२ पैकी २३, वसमतला ११९ पैकी १0६, हिंगोलीत ११ पैकी २७, कळमनुरीत १२५ पैकी ७३, सेनगावात ११२ पैकी १७ ग्रामपंचायतींचा खर्च शून्य आहे.
एकीकडे मग्रारोहयोत सिंचन विहिरी, शेततळे ही कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी कायम बोंब ठोकत असले तरीही अधिकाऱ्यांना त्याचे काहीच गांभिर्य नाही. विशेष म्हणजे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत जिल्ह्याला ११ प्रकारच्या कामांसाठी भरघोस उद्दिष्ट मिळाले. कामांचा मात्र पत्ता नाही. यात सिंचन विहिरींचे १0 हजारांचे उद्दिष्ट असून त्यापैकी ५९६ कामे सुरू झाली आहेत. विहिरींचे ८६८५ प्रस्ताव आले अन् मान्यता २२११ प्रस्तावांना तर प्रशासकीय मान्यता ११६७ जणांना मिळाली. सुरू झालेल्या कामांनाही मे महिन्यात हात लावला. ही कामे पावसाळ्यात पूर्ण कशी करायची? हा प्रश्न आहे.यात औंढा-१३0, वसमत-२३, कळमनुरी-९१, हिंगोली-२२२, सेनगाव-१३0 कामांचा समावेश आहे.
शेततळ्यांच्या तर कामांनाच सुरुवात नाही. मागेल त्याला शेततळेमध्येच जी कामे झाली ती झाली. यात ५६६0 एवढे उद्दिष्ट आहे. २५६ प्रस्ताव आल्यावर ६४ ला तांत्रिक त्यापैकी ३५ ला प्रशासकीय मान्यता दिली. एकही काम सुरू नाही. भूसंजीवनही व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 च्या उद्दिष्टापोटी ६२५ प्रस्ताव आले. ३३७ ला तांत्रिक व त्यापैकी १८९ ला प्रशासकीय मान्यता दिली. कामे ठप्प आहेत. तेवढेच उद्दिष्ट असलेल्या नाडेप कंपोस्टिंगचीही हीच बोंब आहे. ४0७ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता असूनही काम सुरू नाही.
फळबागांचे १८00 हेक्टरचे उद्दिष्ट आहे. ७५ चे प्रस्ताव आले. २४ ला तांत्रिक व त्यापैकी ९ ला प्रशासकीय मान्यता दिली. ही कामे सुरू झाली. निर्मल शौचालय व शोषखड्ड्यांचे ४२00 एवढे उद्दिष्ट आहे. यात २८ कामे सुरू झाली आहेत. समृद्ध गाव तलावांचा ११00 एवढे उद्दिष्ट असूनही प्रस्तावच नाही. रोपवाटिकेचे २२ लाख रोपांचे उद्दिष्ट असून २६ कामे सुरू आहेत. नंदनवन वृक्ष लागवडीची २ कामे होत आहेत. तर समृद्ध ग्राम योजनेत १६00 एवढे उद्दिष्ट असताना ४४१ प्रस्ताव आले. तांत्रिक मान्यतेनंतर प्रक्रिया ठप्प आहे.