छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात २४८ पाणंद रस्ते पूर्ण; मजुरांअभावी रखडली कामे
By विजय सरवदे | Published: May 23, 2024 07:16 PM2024-05-23T19:16:39+5:302024-05-23T19:17:25+5:30
उद्दिष्टपूर्तीसाठी जि.प.चा मनरेगा विभाग अपयशी
छत्रपती संभाजीनगर : रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजुरांची संख्या मोठी आहे; पण मजुरांचा कल गुरांचे गोठा, घरकुले, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी, अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामांकडेच जास्त आहे. पाणंद रस्त्यांच्या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवल्यामुळे वर्षभरात २४८ पाणंद रस्ते पूर्ण होऊ शकले. दरम्यान, मातोश्री पाणंद रस्ता योजनेंतर्गत १ हजार ४९० रस्त्यांचे निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या रोजगार हमी योजना विभागाला मावळत्या आर्थिक वर्षात अपयश आले.
रोजगार हमीच्या एकूण सर्वच कामांवर वर्षभरात १ कोटी १३ लाख मनुष्य दिवसांची निर्मिती झाली; पण पाणंद रस्त्यांकडे त्यांनी पाठ फिरवली. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेद्वारे गुरांचा गोठा, ग्रामपंचायत भवन, पेव्हर ब्लॉक, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक विहिरी अशी वैयक्तिक कामे सुरू आहेत. त्यामुळे सर्वाधिक मनुष्यबळ त्या कामांतच व्यस्त आहे. परिणामी, पाणंद रस्त्यांची कामे गतीने होत नाहीत. निश्चित केलेल्या रस्ते कामांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा परिषदेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाने सातत्याने पाठपुरावाही करण्याची गरज आहे, असे बोलले जाते.
साधारणपणे, हिवाळ्यापासूनच पाणंद रस्ते कामांनी गती घ्यायला हवी. आता पावसाचे दिवस तोंडावर आले आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा असतो. पाऊस सुरू झाल्यानंतर पाणंद रस्ते अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्याची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाणंद रस्त्याच्या कामावर भर दिला जावा, असे शासनाचे धोरण आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर त्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसत आहे.
पैठण तालुक्यात आघाडीवर
यासंदर्भात ‘मनरेगा’ विभागाकडून मिळालेली माहिती अशी आहे की, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पाणंद रस्त्यांची जिल्ह्यात १ हजार ४९० कामे करण्याचे उद्दिष्ट होते. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत २४८ पाणंद रस्ते तयार झाले असून, यात पैठण तालुक्यात सर्वाधिक ८९, तर फुलंब्री- ५, खुलताबाद- २, तर सोयगाव तालुक्यात ९ रस्ते पूर्ण झाले आहेत.