औरंगाबाद जिल्ह्यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण; सात गरोदर मातांचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:51 PM2018-10-08T19:51:38+5:302018-10-08T19:52:13+5:30
रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.
औरंगाबाद : जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाच्या अधिपत्याखालील जिल्ह्यात २३ आयसीटीसी केंद्रांत एप्रिल ते आॅगस्टदरम्यान ३३ हजार ४४६ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यात २४९ व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या संख्येत काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगेश गायकवाड यांनी सांगितले.
जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण समिती व एचआयव्ही, टीबी समन्वय समितीची त्रैमासिक आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी मंगेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक डॉ.जमादार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. आर. लड्डा, डॉ. जी. एम. कुडलीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, विजय देशमुख, डॉ. एम. टी. साळवे, संजय पवार, ज्योती वाडेकर यांची उपस्थिती होती.
पाच महिन्यांत ३१ हजार ९१८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ गरोदर मातांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात ५ हजार ३९१ रुग्ण एआरटी केंद्रांत औषधोपचार घेत असल्याची माहिती मंगेश गायकवाड यांनी दिली.
रुग्णांचे केले जाते मोफत समुपदेशन
डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, घाटी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय, मोबाईल व्हॅन, अशा २३ आयसीटीसी केंद्रांत आणि ५० प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता, सामान्य रुग्ण, संशयित क्षयरोगी व जोखीम गटातील व्यक्तींची मोफत एचआयव्ही रक्तचाचणी व समुपदेशन केले जाते.