कंत्राटदारानेच आणला अडीच कोटींचा निधी; औरंगाबाद येथे सव्वाकोटी खर्चाच्या रोझ गार्डनचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:35 PM2018-01-15T13:35:39+5:302018-01-15T13:39:46+5:30
केंद्राकडून निधीच प्राप्त होत नसल्याने विकास कामे करणारा कंत्राटदार संकटात सापडला. कंत्राटदारानेच मुंबई, दिल्ली वार्या करून तब्बल अडीच कोटींचा निधी मिळविला.
औरंगाबाद : पर्यटनाला चालना देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने औरंगाबाद शहरासाठी खास मेगा सर्किट योजनेंतर्गत २४ कोटींचा घसघशीत निधी मंजूर केला होता. या निधीच्या अधीन राहून महापालिकेने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील दुभाजक, मजनूहिल येथे रोझ गार्डनचे कामही सुरू केले. केंद्राकडून निधीच प्राप्त होत नसल्याने विकास कामे करणारा कंत्राटदार संकटात सापडला. कंत्राटदारानेच मुंबई, दिल्ली वार्या करून तब्बल अडीच कोटींचा निधी मिळविला.
ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांना ज्या मूलभूत सोयी-सुविधा मिळायला पाहिजे तशा मिळत नसल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. केंद्र शासनाने मेगा सर्किट योजनेत एमटीडीसीमार्फत औरंगाबाद शहराला २४ कोटींचा निधी मंजूर केला. महापालिकेने विविध विकास कामांच्या निविदाही प्रसिद्ध केल्या. हॉटेल कार्तिकी ते जामा मशीदपर्यंत मुगल आर्टप्रमाणे दगडाचे खास दुभाजक तयार करण्यात आले. याच बरोबर मजनूहिल येथे ३ एकर जागेवर रोझ गार्डन उभारण्याचे काम सुरू झाले. एकाच कंत्राटदाराला हे काम मिळाले. दुभाजकाचे काम संपले तरी केंद्राकडून निधी मिळत नव्हता. रोझ गार्डनचेही काम अर्धवट सोडून देण्यात आले. भाजप सरकारने जुन्या काँग्रेसच्या सर्व योजना रद्द करून टाकल्या. त्यामुळे या विकास कामांसाठी निधी मिळणे असंभव होऊन बसले. ज्या कंत्राटदाराने कामे केली त्यानेच मुंबई आणि दिल्ली येथे चकरा मारून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी या कामात मोलाची मदत केली. त्यांनी दुभाजकाच्या जुन्या कामासाठी १ कोटी आणि रोझ गार्डनला चालना देण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी केंद्राकडून मिळवून दिला. नुकताच हा निधी मनपाला प्राप्त झाल्याचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सांगितले.
शहराच्या वैभवात भर पडेल
देशभरात रोझ गार्डन बरेच आहेत. काश्मीरच्या धर्तीवर औरंगाबादेत रोझ गार्डन उभारण्यात येणार आहे. गार्डनच्या उभारणीचे बेसिक काम पूर्ण झालेले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त सव्वाकोटीतून गार्डनचे किमान ४० ते ५० टक्के काम पूर्ण होईल. एकूण पावणेतीन कोटींमध्ये गार्डन उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. गार्डनच्या अंतिम टप्प्यात काम पोहोचल्यावर केंद्र शासनाकडून आणखी एक ते सव्वाकोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.