७० मीटर उंच इमारतींसाठी २५ कोटींचे लॅडर; फिनलँडच्या कंपनीसोबत मनपाची चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:26 PM2024-08-12T19:26:35+5:302024-08-12T19:26:58+5:30
७० मीटर उंच इमारतींसाठी लॅडर तयार करणाऱ्या जगात तीनच कंपन्या आहेत. जर्मनी, इटली आणि फिनलँड येथे या कंपन्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरात ७० मीटर उंच इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास मनपाने सुरुवात केली. भविष्यात मुंबई-पुण्याच्या धर्तीवर शहरातही टोलेजंग इमारती उभारल्या जातील. एवढ्या उंच इमारतींमध्ये आग लागल्यास मोठ्या लॅडरची गरज पडेल. त्यामुळे महापालिकेने २५ कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय कंपनीकडून लॅडर खरेदीचा निर्णय घेतला. निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. फिनलँड येथील एका कंपनीने स्वारस्य दाखविले असून, या कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे.
७० मीटर उंच इमारतींसाठी लॅडर तयार करणाऱ्या जगात तीनच कंपन्या आहेत. जर्मनी, इटली आणि फिनलँड येथे या कंपन्या आहेत. महापालिकेने २५ कोटींच्या लॅडर खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली. दोन वेळेस निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यावर फिनलँड येथील कंपनीने प्रतिसाद दिला. महापालिकेच्या निवड समितीने लॅडर खरेदीसाठी अत्यंत कठीण अशा अटी ठेवल्या. लॅडर पुरवठा करणाऱ्या कंपनीने अनामत रक्कम जमा करावी असे त्यात नमूद केले आहे. इच्छुक कंपनीने अनामत रक्कम न घेता, बँक गॅरंटी घ्यावी अशी विनंती मनपाकडे केली. निवड समितीकडे हा प्रस्ताव ठेवण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून मनपा लॅडर घेत आहे. भारतीय वातावरणात हे लॅडर चालले पाहिजे यादृष्टीने तांत्रिक बारकावेसुद्धा तपासले जात आहेत. मुंबई, पुणे, आदी शहरांमध्ये फिनलँड येथील कंपनीचेच लॅडर वापरले जात आहेत. जर्मनी आणि इटली येथील कंपन्यांनी भारतात आजपर्यंत लॅडरचा पुरवठा केलेला नाही. भारतात लॅडर पुरवठा केलेला हवा अशी अटही मनपाने टाकलेली आहे. त्यामुळे फिनलँड येथील कंपनीसोबतची चर्चा यशस्वी होईल, अशी अपेक्षा मनपाला आहे.
अग्निशमन बंबाला मोठी शिडी नाही
सध्या मनपाकडे असलेल्या अग्निशमन विभागाच्या वाहनात मोठी शिडी असते. ही शिडी दोन मजल्यांच्यावर जाता येत नाही. शिडी वापरतानाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शहरात सध्याही ५ ते १५ मजल्यांपर्यंत इमारती उभारण्यात आलेल्या आहेत.
मोठ्या इमारतींशिवाय पर्याय नाही
शहरात जमिनींचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. शहराच्या चारही बाजूने शहर झपाट्याने वाढत असेल तर भविष्यात उंच इमारतींशिवाय पर्याय नाही. पुढील वर्षभरात शहरात मुबलक पाणी आल्यानंतर उंच इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडेल असे मनपाला वाटत आहे. त्यामुळे आतापासूनच ७० मीटर उंच इमारतींना बांधकाम परवानगी देणे सुरू केले आहे.
लॅडर खरेदी लवकरच
लॅडर खरेदीचा मुद्दा अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. अनेक ठिकाणी पाहणी केल्यानंतर मनपाने निविदा प्रसिद्ध केली. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर मनपाला आधुनिक लॅडर प्राप्त होईल.
- अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता मनपा.