२५ टक्के मोफत प्रवेशाचा फज्जा
By Admin | Published: May 23, 2016 11:28 PM2016-05-23T23:28:38+5:302016-05-23T23:33:16+5:30
संजय तिपाले ल्ल बीड बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा नियम आहे.
संजय तिपाले ल्ल बीड
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेशाचा नियम आहे. मात्र, जिल्ह्यात मोफत प्रवेशाचा पुरता फज्जा उडाला आहे. आतापर्यंत केवळ ३५० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश नोंदी केल्या आहेत.
विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत व स्वयंअर्थसहायित शासनमान्यताप्राप्त शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देतात, त्यांचे शैक्षणिक शुल्क शासन संस्थांना अदा करते. इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांचा ओढा आहे. मात्र, विशिष्ट शाळांनाच पालक पसंदी देतात. २०१६- १७ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पालकांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन नोंदी करावयाच्या आहेत. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्या शाळांमध्येच १५ ते २३ मे २०१६ या दरम्यान आॅनलाईन प्रवेश नोंदी करावयाच्या होत्या. मात्र, याबाबत पुरेशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे केवळ ३५० इतक्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदी झाल्या आहेत.
जिल्ह्यात १२८ शाळांमध्ये १५७९ जागा
जिल्ह्यातील १२८ इंग्रजी शाळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के प्रमाणे १५७९ जागांवर अनुसूचित जाती, जमाती व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात; परंतु आॅन्लाईन प्रवेश नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट ठरू लागली आहे. अनेक पालकांना आॅनलाईन प्रवेश नोंदी करायच्या आहेत हेच माहीत नाही. मोफत प्रवेशपासून विद्यार्थी वंचित ठेवण्याचा हा पद्धतशीर डाव असल्याचा आरोप शिवसंग्रामचे मनोज जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
सोडत पद्धतीने निवड
विशिष्ट नामांकित शाळांमध्ये २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशासाठी पालकांनी उपलब्ध जागांपेक्षा अधिक नोंदी केल्या आहेत. त्यामुळे तेथे सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. सोडतीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार असून यावेळी विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी शाळांमध्ये पाठविले जातील, असे शिक्षणाधिकारी (प्रा.) हिंगोणेकर यांनी सांगितले.
३० मेपर्यंत मुदतवाढ
२५ टक्के कोट्यातून आॅनलाईन प्रवेश निश्चितीसाठी १५ ते २३ मे ही मुदत होती. मात्र, अनेक पालक यापासून अनभिज्ञ राहिले. शिवाय ग्रामीण भागात शाळा सुरु झाल्यानंतर पालक प्रवेशाची लगबग करतात. उन्हाळी सुट्यामुळे आॅनलाईन नोंदीला थंडा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाकडून ३० मे पर्यंत प्रवेश निश्चिसाठी मुदतवाढ दिली आहे. जास्तीत जास्त पालकांनी २५ टक्के मोफत प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर यांनी केले आहे.