औरंगाबादमध्ये २५ लाखाची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:53 AM2019-10-17T10:53:20+5:302019-10-17T10:53:39+5:30
एटीएममध्ये नोटा जमा करणाऱ्या कंपनीची ही रक्कम असल्याचा सबंधितने दावा केला.
औरंगाबाद: २५ लाखाची रोकड निवडणूक विभागाच्या स्थायी पथकाने वोखार्ड चौकाजवळ पकडली. एटीएममध्ये नोटा जमा करणाऱ्या कंपनीची ही रक्कम असल्याचा सबंधितने दावा केला. मात्र पुरेसा पुरावा सादर न केल्याने नोटा आयकर विभागाला कळवून ट्रेझरीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला पथक प्रमुख सी एस बेग यांनी ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जळगाव रोडवर वोखार्ड कंपनी चौकात निवडणूक विभागाचे स्थायी पथक येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची कार त्यांनी थांबविली. यावेळी कारची ईन कॅमेरा तपासणी केली असता कारमधील काळ्या पेटीत पाचशे रुपयांची अनेक बंडले असल्याचे दिसले. या नोटांची पंचासमक्ष मोजणी केली असता ही रक्कम २५ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले.
कारमधील व्यक्ती संदीप लोखंडे आणि सचीन मोटे यांनी ते एस एस टी कंपनीचा नियंत्रक असल्याचे आणि त्यांनी या नोटा शहागंज मधील भारतीय स्टेट बॅंकेतुन आणल्याचे सांगितले. त्यांची कंपनी एटीएममध्ये नोटा जमा करण्याचे काम करते असे त्यांनी सांगितले. ही रक्कम शहरातील १७ एटीएम मध्ये भरण्यासाठी नेली जात होती अशी माहिती दिली. मात्र नोटाविषयी ते कोणताही अधिकृत कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीत. यामुळे पंचनामा करून नोटा जप्त करण्यात आल्या. या रोकडची माहिती निवडणूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि आयकर विभागाला कळविण्यात येत आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी डी बी काटकर, व्ही व्ही लिपाने, विजय पंडुरे आणि विडीओग्राफर जितेंद्र गायकवाड यांनी केली.