विद्यापीठात ७३ जागांच्या भरती अर्जातून मिळाले २५ लाख, एका जागेसाठी ८० जण स्पर्धेत
By राम शिनगारे | Published: September 19, 2023 07:51 PM2023-09-19T19:51:50+5:302023-09-19T19:52:43+5:30
तब्बल ५ हजार ८१५ जणांचे प्राध्यापक होण्याचे स्वप्न
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ प्राध्यापकांच्या भरतीसाठी अर्ज मागवले होते. अर्ज दाखल करण्याच्या २१ दिवसांच्या मुदतीत तब्बल ५८१५ जणांनी शुल्कासह ऑनलाइन अर्ज केले. अर्जाच्या शुल्कातून विद्यापीठाला तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या आकडेवारीवरून पात्रताधारक बेरोजगारांची भयंकर स्थिती दिसते.
विद्यापीठात विविध विभागांमध्ये २८९ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील तब्बल १५० पदे रिक्त असून, शासनाने त्यातील ७३ पदांच्या भरतीसाठी मंजुरी दिली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने ७३ जागांच्या भरतीसाठी २३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविले. अर्जाच्या शेवटपर्यंत तब्बल ५८१५ जणांनी शुल्क भरून ऑनलाइन अर्ज केले. त्यात खुल्या प्रवर्गासाठी ५००, आरक्षितसाठी ३०० रुपयांचे शुल्क ठेवले होते. या शुल्कापोटी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. एका जागेसाठी तब्बल ७९.७ एवढे पात्रताधारक स्पर्धेत असल्याचेही आकडेवारीतून दिसते.
पदनिहाय अर्ज
विद्यापीठात ७३ जागांसाठी अर्ज मागविले. ३ जागा प्रोफेसर, २० असोसिएट प्रोफेसर आणि ५० असिस्टंट प्रोफेसर पदांच्या होत्या. त्यात प्रोफेसर पदासाठी १११, असोसिएटसाठी ७९५ आणि असिस्टंटसाठी तब्बल ४९०९ पात्रताधारकांनी अर्ज केले. तिन्हींची मिळून संख्या ५८१५ इतकी आहे.
विज्ञान विषयात सर्वाधिक अर्ज
असिस्टंट प्रोफेसरच्या केमिस्ट्री विषयातील जागांसाठी तब्बल ४५२ जणांनी अर्ज केले. त्याशिवाय फिजिक्स ३९३, बॉटनी ४४३, झुऑलॉजी ३४६, गणित २५५, बायोटेक्नॉलॉजी २३०, केमिकल टेक्नॉलॉजीत १७४ जणांनी अर्ज केले. त्याशिवाय मराठी ३६२, हिंदी १६६, इंग्रजी ३७२, अर्थशास्त्र २३१, राज्यशास्त्र २७२, समाजशास्त्र २०३, पत्रकारिता १२०, कॉमर्स विषयासाठी १६७ जणांनी अर्ज केले आहेत.
प्रचंड बेरोजगारी असताना भरतीला विरोध
प्राध्यापक होण्यासाठी पात्रताधारक बेरोजगारांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. एका जागेसाठी तब्बल ८० जण रांगेत आहेत. अशी स्थिती असताना विद्यापीठातील संभाव्य भरतीला सत्ताधारी भाजप संबंधित विद्यापीठ विकास मंचने विरोध केलेला आहे. त्यासाठी उच्च शिक्षण प्रभारी संचालकांमार्फत चौकशी समितीही नेमली आहे. या विरोधाला पात्रताधारकांनी अर्ज भरून प्रतिसाद देत चपराक दिल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
पुढील प्रक्रिया होईल
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात पारदर्शकपणे प्राध्यापक भरतीची प्रक्रिया होत आहे. हार्डकॉपी दाखल करण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.
-डॉ. भगवान साखळे, कुलसचिव