मारहाण करीत २५ लाखांची लूट
By Admin | Published: October 12, 2016 12:05 AM2016-10-12T00:05:53+5:302016-10-12T00:08:33+5:30
वाशी : तालुक्यातील इसरूप गावच्या शिवारात असलेल्या विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्कीवरील सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यास मारहाण करून चोरट्यांनी ट्रान्स्फार्मरमधील तांब्याच्या उपकरणांची चोरी केली़
वाशी : तालुक्यातील इसरूप गावच्या शिवारात असलेल्या विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्कीवरील सुरक्षा अधिकारी, कर्मचाऱ्यास मारहाण करून चोरट्यांनी ट्रान्स्फार्मरमधील तांब्याच्या उपकरणांची चोरी केली़ बचावासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गोळीबार केल्यानंतर पळून गेलेल्या चोरट्यांनी परत हल्ला करून जवळपास २५ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याचे वृत्त आहे़
याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील इसरूप, खानापूर व भूम तालुक्यातील दिंडोरी, हिवरा गावच्या शिवारात विन्डवल्ड कंपनीच्या पवनचक्क्या आहेत. २६ पवनचक्क्याचे काम पूर्ण झालेले असून ६ पवनचक्क्यांची उभारणीचे काम सुरू आहे़ पवनचक्क्याच्या रक्षणासाठी कंपनीने सन सेक्युरिटी कंपनीकडून सुरक्षा कर्मचारी नेमले आहेत़ या कर्मचाऱ्याची संख्या ५५ असून त्यांची ड्यूटी ही १२ तासाची आहे. दिवसपाळीस १४ कर्मचारी कार्यरत असतात़ तर रात्र पाळीस ४१ कर्मचारी कार्यरत असतात. सेक्यूरिटीचे इन्चार्ज म्हणून वाशी येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश रणदिवे आहेत़ रणदिवे हे रविवारी रात्री इसरूप शिवारातील लोकेशन नंबर वाय - २ या पवनचक्कीवर कार्यरत होते.
१० ते १५ चोरटे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पवनचक्कीच्या आवारातील ट्रान्स्फार्मरजवळ दिसून आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली़ चोरट्यांकडून दगडफेक होत असल्याने सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी रायफलमधून हवेत काही फैैरी झाडल्या. यामुळे चोरटे पळून गेले़ मात्र, काही वेळातच परत येवून त्यांनी सुरेश रणदिवे व येरमाळा येथील सुरक्षा सहाय्यक शेख यांना जबर मारहाण केली़ त्यानंतर मुख्य ट्रान्सफ ार्मरमधील तांब्याच्या क्वाईल घेऊन पोबारा केला़ दरम्यान, याप्रकरणी जखमींचे जबाब घेतल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़