तंबाखूपायी महिन्याला २५ कोटींचा ‘चुना’!
By Admin | Published: May 30, 2016 11:56 PM2016-05-30T23:56:07+5:302016-05-31T00:02:49+5:30
संजय तिपाले ल्ल बीड तंबाखूतून बीडकरांच्या खिशाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा ‘चुना’ लागत आहे. तंबाखूने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून महिन्याची उलाढाल २५ कोटींच्या घरात आहे.
संजय तिपाले ल्ल बीड
तंबाखूतून बीडकरांच्या खिशाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा ‘चुना’ लागत आहे. तंबाखूने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून महिन्याची उलाढाल २५ कोटींच्या घरात आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाकिटावर ठळकपणे दाखवूनही विक्रीत फारसा फरक नाही. ३१ ते ४० वयोगटांतील व्यक्तींना तंबाखूच्या विड्याचे अक्षरश: वेड लागले आहे. परिणामी दंत, मुख रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सेवन विरोधी दिनाच्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलेला हा धक्कादायक निष्कर्ष...
सहज उपलब्ध होणाऱ्या व कुठेही हातावर मळून तोंडात सोडता येणाऱ्या तंबाखूला मजुरांपासून ते नेते, अभिनेते व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचीच पंसती आहे. ही एकमेव अशी तलफ अशी आहे जी कोणासोबतही ‘शेअर’ करता येते. तंबाखू सोबतच बाळगावी असेही काही नाही.
अनोळखी व्यक्तीकडेही तंबाखूची मागणी केली जाते.काही जणांच्या तर इतके अंगवळणी पडले आहे की, जाहीरपणे तंबाखू हातावर मळून तोंडात सोडली जाते. ग्रामीण भागात या व्यसनाचे प्रमाण अधिक असून महिलाही मोठ्या संख्येने आहारी जाऊ लागल्या आहेत. खेड्यांमध्ये १०० महिलांमागे १८ महिलांना तंबाखूचे व्यसन आहे.
घातक दुष्परिणाम...: पुरूष वंध्यत्वाच्या तक्रारींत वाढ
तंबाखूच्या व्यसनाने नपुसकत्वासारख्या आजाराची शक्यता अधिक असते. शुक्राणुवर दुष्परिणाम होऊन पुरूष वंध्यत्वाच्या समस्या वाढतात. बिडी, सिगारेटमुळे श्वसनाचे विकार होतात. सुरूवातीला खोकला, कफाचा त्रास यामुळे श्वसनाचे काम करणाऱ्या नलिकेचे आकुंचन पावते व त्याची गती कमी होते. दम्यासह श्वसनाचे आजार जडतात. जबडा उघडताना चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात व त्रास होतो, बऱ्याच वेळेस जबड्यात दोन बोटेही जात नाहीत. याचेच रूपातंर पुढे कॅन्सरमध्ये होते. कॅन्सर, हृदयरोग आणि अर्धांगवायूशिवाय हजारो लोकांचे पाय फक्त तंबाखू सेवनांमुळे सडतात. ‘गँगरीन’ झाल्याने ते कापून टाकावे लागतात. व्यसन संपत नाही परंतु ते माणसाला संपविते. त्यामुळे शारीरिक व आर्थिक हानी कोणालाही न परवडणारीच असते.