२५ % लोकांना ग्रीन कार्डची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:13 AM2018-06-18T01:13:03+5:302018-06-18T01:13:58+5:30
अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरी, धंदा करायचा असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते; परंतु सध्या हे ग्रीन कार्ड हवे असणाऱ्यांना कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या २५ टक्के लोकांनाही ग्रीन कार्डची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अमेरिकेत स्थायिक होऊन नोकरी, धंदा करायचा असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते; परंतु सध्या हे ग्रीन कार्ड हवे असणाऱ्यांना कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या २५ टक्के लोकांनाही ग्रीन कार्डची प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमेरिकेतील ‘यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ या संस्थेच्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. संस्थेतर्फे ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या आधारावर ‘कँटो इन्स्टिट्यूट’ने प्रतीक्षा यादीची नवीन समीकरणे मांडली आहेत. एप्रिल २०१८ पर्यंत अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या भारतीयांची संख्या ६ लाख ३२ हजार २१९ इतकी आहे. यात औरंगाबादसह मराठवाड्यातून अमेरिकेत गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. नोकरीनिमित्त अमेरिके त गेलेल्यांची संख्या मोठी आहे; परंतु सध्या अमेरिकेने स्वदेशी नीतीचा अवलंब सुरू केला आहे. व्हिसावर काम करीत असल्याने नागरिकांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेला आहे.
ग्रीन कार्ड कोणाला आणि कधी द्यायचे, याचे निकष आहेत. जो अत्यंत कुशल आहे, उच्चशिक्षित आहे त्याला ६ वर्षांची तर पदवीधरांना १७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर कामगार असून त्यांना ग्रीन कार्ड मिळण्यासाठी १५१ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच त्यांना कधीच ग्रीन कार्ड मिळणार नाही, असा निष्कर्ष संस्थेने काढला आहे.