६८ कोटी रुपयांतून २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:04 AM2020-12-30T04:04:21+5:302020-12-30T04:04:21+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) परिसरातील ६८ कोटी रुपयांच्या २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) परिसरातील ६८ कोटी रुपयांच्या २५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील हेल्थ सर्व्हिसेस कन्सलटंन्सी कार्पोरेशनने (एचएससीसी) ३१ डिसेंबरपूर्वी घाटी प्रशासनास हस्तांतरित करावे. तत्पूर्वी इमारतीतील सर्व सोयी-सुविधा पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, २०१६ मध्ये बांधकाम सुरू झालेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम २०१८ अखेर पूर्ण झाले. इमारतीतील वॉटरप्रुफिंग, बाँड, स्वतंत्र पाण्याची व्यवस्था, विजेच्या आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात. घाटी प्रशासनाने मुलींच्या वसतिगृहास मुबलक पाणीपुरवठा करावा. घाटी परिसरातील अतिक्रमण काढण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. बैठकीस अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी, एचएससीसीचे राजकुमार शर्मा, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता एस. एस. भगत, कदीर अहमद, कार्यकारी अभियंता एस. व्ही. नंदनवनकर, एस. बी. डोंगरे, ए. बी. काळे यांची उपस्थिती होती.