ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादनास लागणार २५० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 05:26 PM2020-11-04T17:26:18+5:302020-11-04T17:27:24+5:30
दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी मागील १० वर्षांत गतीने निर्णय झाले नाहीत
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सर्व जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी तयार केलेल्या महत्त्वाकांक्षी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनच्या भूसंपादनासाठी २५० कोटींच्या आसपास रक्कम लागणार आहे. भूसंपादन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, लवकरच त्यांच्या उपस्थितीत याबाबत बैठक होणार आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील वरिष्ठ अभियंते आणि समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ११० हेक्टर जमिनीचे संपादन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार होणार आहे. हेक्टरी रक्कम भूसंपादनासाठी द्यावी लागणार असून, जमीन सर्वेक्षणानंतर पुढील निर्णय होणार आहे.दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी मागील १० वर्षांत गतीने निर्णय झाले नाहीत, तसेच योजनेसाठी निर्धारित केलेली रक्कमदेखील उपलब्ध झाली नाही, त्यामुळे भसूंपादन रखडले. योजनेचे काम करणारे गुत्तेदार आणि महामंडळ यांच्यात यावरून सारखाच पत्रव्यवहार झाला आहे.
भूसंपादन करण्यासाठी अजून सर्व्हेच नाही
भूसंपादन करण्यासाठी अजून सर्व्हेच करण्यात आलेला नाही. शिवाय शासनाकडून जे बजेट महामंडळाला मिळते, त्यामध्ये या योजनेसाठी किती रक्कम येते, त्यात भूसंपादनासाठी किती रक्कम मिळणार, त्यावर भूसंपादनाच्या गतीचे भविष्य अवलंबून असल्याचे सूत्रांनी सांगितले.