इलेक्ट्रिकवरील २५० कार, १ हजार बाईक शहरात येणार; 'मिशन ग्रीन मोबिलिटी'ने शहराची ओळख बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 07:33 PM2022-01-29T19:33:16+5:302022-01-29T19:33:56+5:30
शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सध्या ८ चार्जिंग स्टेशन आहेत.
वाळूज महानगर : औरंगाबाद व मराठवाड्यात ईव्ही इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या वतीने ‘औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढावा, हा अभियान राबविण्यामागचा उद्देश आहे, असे ऑटो क्लस्टरचे चेअरमन मुनीष शर्मा यांनी सांगितले.
मुनीष शर्मा म्हणाले की, पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत चालले असून, जगभरात प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न आहे. यावेळी ऑटो क्लस्टरचे संचालक आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन व तांत्रिक बाबीविषयी माहिती दिली. यावेळी सैफुद्दीन अब्बास व अनिल मिराशी या इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांनी आपले अनुभव कथन केले.
२५० इलेक्ट्रिक चारचाकी, तर १ हजार दुचाकीला पसंती
इंधनाचा खर्च टाळण्यासाठी, तसेच प्रदूषणमुक्त वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढत आहे. शहर व मराठवाड्यात २५० चारचाकी, १ हजार दुचाकी, ५० बस, ५०० तीनचाकी वाहने खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी पसंती दर्शविली आहे. या मिशनला पाठिंबा देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचे काम क्लस्टरच्या माध्यमातून सुरू आहे.
चार्जिंग स्टेशनची संख्या २० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न
शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी सध्या ८ चार्जिंग स्टेशन आहेत. इलेक्ट्रिक वाहनाला टोल, टॅक्सपासून सूट देण्यात आली असून, पीयूसीची आवश्यकता नाही. लवकरच शहर व वाळूज परिसरात नव्याने १२ चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
१५ लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनाला सबसिडी
प्रदूषणमुक्त वाहने खरेदीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वतीने वाहने खरेदी करणारांना १ लाखापासून अडीच लाखांपर्यंत सबसिडी देण्यात येते. १५ लाखांपर्यंतचे वाहन खरेदी करणारासही सबसिडीचा लाभ मिळत असून, केंद्र व राज्य शासनाकडून मार्चअखेरपर्यंत सबसिडीची मुदत वाढविण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदीला वेग येण्याची शक्यताही चेअरमन मुनीष शर्मा यांनी वर्तविली आहे.