कोरोनाच्या उपचारातून दररोज २५० किलो वेस्ट; विल्हेवाट लावण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 07:42 PM2020-06-01T19:42:37+5:302020-06-01T19:43:58+5:30
कोणाला संसर्ग होऊ नये, यासाठी त्याची सुरक्षितपणे हाताळणी आणि विल्हेवाट लावण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे.
औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारातून दररोज मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट निर्माण होत आहे. एकट्या घाटीत रोज तब्बल कोरोनाच्या उपचारातून २५० किलो बायोमेडिकल वेस्ट जमा होत आहे. त्यातून कोणाला संसर्ग होऊ नये, यासाठी त्याची सुरक्षितपणे हाताळणी आणि विल्हेवाट लावण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे.
कोरोनाचे रुग्ण तपासताना अनेक वैद्यकीय साधनांचा वापर होतो. मास्क, ग्लोव्हज, सिरिंज, औषधांच्या बाटल्या व अन्य बरेचसे साहित्य दररोज टाकून द्यावे लागते. त्यामुळे दररोजचा कचरा तात्काळ नष्टही करावा लागतो. त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
स्वॅब घेण्यापासून उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. एक पीपीई कीट ६ तास वापरता येतो. एकदा वापरलेले पीपीई कीट पुन्हा वापरता येत नाही. वापरलेल्या कीटची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घाटीत स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी वापरलेले कीट गोळा केले जातात. कीटसह वापरलेले मास्क, सलाईन, इंजेक्शनचे संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पीपीई कीट वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात जमा होणारे बायोमेडिकल वेस्ट एका कंपनीकडून संकलन करून नष्ट केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले. योग्य काळजी घेऊन वेस्टची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले..