औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात २५० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:58 PM2018-05-04T17:58:27+5:302018-05-04T18:01:14+5:30
सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़ यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, तर २७९ उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा दिली जाते; परंतु जि. प. आरोग्य विभागात १ हजार २५ पैकी ७७४ पदे भरलेली आहेत. सध्या जवळपास २५० पदे रिक्त आहेत़ यामुळे उपलब्ध मनुष्यबळावरच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिली जात आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी जिल्हा आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यामध्ये आरोग्य सहायिकांची ९४ पदे वाढली आहेत. काही पदे रिक्त आहेत. यासंदर्भात रिक्त पदांचा संवर्गनिहाय प्रस्ताव गेल्या वर्षी शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून भरतीच झाली नसल्यामुळे आहे त्या मनुष्यबळावर आरोग्य सेवा दिली जात आहे. माता बालसंगोपन विभागात ४७ कंत्राटी आरोग्य सहायिकांच्या माध्यमातून कामकाज केले जाते. असे असले तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांमध्ये चोखपणे रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शस्त्रक्रिया शिबिरे पार पाडली जात आहेत. दवाखान्यांमध्येच प्रसूती झाली पाहिजे, यासाठी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो. याचा ग्रामीण भागात चांगला परिणाम दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ११२ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, यापैकी १११ पदे भरलेली आहेत. मात्र, १२ वैद्यकीय अधिकारी हे पदव्युत्तर शिक्षणासाठी सुटीवर गेले आहेत, तर काही महिला डॉक्टर प्रसूती रजेवर आहेत. सध्या एकूण २९ डॉक्टर विविध कारणास्तव गैरहजर असल्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवेवरचा ताण वाढला आहे.
रिक्त पदांची संख्या अशी
जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी-१, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी-१, तालुका आरोग्य अधिकारी-१, वैद्यकीय अधिकारी गट अ- १, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेद- १, जिल्हा विस्तार व मध्यम अधिकारी-१, आरोग्य सेवक पुरुष- १०६, आरोग्य सहायक पुरुष -१३, आरोग्य सेवक महिला- १६८, आरोग्य सहायक महिला-१०, औषध निर्माण अधिकारी-४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-२, युनानी हकीम-५, आरोग्य विस्तार अधिकारी-२, कुष्ठरोग तंत्रज्ञ- २७, अवैद्यकीय पर्यवेक्षक- ३ आदी़.