औरंगाबाद जिल्ह्यात लाभार्थ्यांनी ४ महिन्यांत खोदल्या २५० विहिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 08:11 PM2018-06-20T20:11:19+5:302018-06-20T20:13:22+5:30

नव्याने अमलात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत निवडलेल्या ४६५ पैकी तब्बल २५० लाभार्थी शेतकऱ्यांनी अवघ्या चारच महिन्यांत विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण केले आहे. 

250 wells dug in 4 months of beneficiaries in Aurangabad district | औरंगाबाद जिल्ह्यात लाभार्थ्यांनी ४ महिन्यांत खोदल्या २५० विहिरी 

औरंगाबाद जिल्ह्यात लाभार्थ्यांनी ४ महिन्यांत खोदल्या २५० विहिरी 

googlenewsNext
ठळक मुद्देपात्र ९१२ अर्जांपैकी ४६५ लाभार्थ्यांची नवीन विहीर अनुदानासाठी निवड करण्यात आली.

औरंगाबाद : नव्याने अमलात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत निवडलेल्या ४६५ पैकी तब्बल २५० लाभार्थी शेतकऱ्यांनी अवघ्या चारच महिन्यांत विहिरींचे खोदकाम जवळपास पूर्ण केले आहे. 

यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजना राबविली जायची. मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जायचे. १ लाखात विहिरीचे काम पूर्ण होत नसल्यामुळे विहिरींचे काम अर्धवट सोडून दिले जायचे. शासनाने गेल्या आर्थिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी डॉ. आंबेडकरांच्या नावाने कृषी स्वावलंबन योजना आणली. या योजनेंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, विहीर खोदल्यानंतर संबंधित लाभार्थी शेतकऱ्याला वीज कनेक्शनसाठी १० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २५ हजार रुपये, तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपयेही मागणीनुसार दिले जाणार आहेत. पूर्वी विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान घेतले असेल, अशा शेतकऱ्यांना विहीर दुरुस्ती किंवा खोलीकरणासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडे एकूण २ हजार ६०८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ८७२ जणांनी यापूर्वी लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले, तर ४६३ जणांनी योजनेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. त्यामुळे हे अर्ज बाद करण्यात आले. पात्र ९१२ अर्जांपैकी ४६५ लाभार्थ्यांची नवीन विहीर अनुदानासाठी निवड करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या उपस्थितीत फेब्रुवारी महिन्यात लााभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाचे तालुकानिहाय ९ कृषी अधिकारी व २० कृषी विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर खोदण्याची आखणी करून देण्यात आली. त्याच अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांनी विहिरींचे काम पूर्ण केले आहे. काहींचे काम प्रगतिपथावर आहे.  विहिरींची कामे होतील, त्यानुसार मोजमाप पुस्तिकेत त्यांच्या नोंदीदेखील हेच अधिकारी घेतील व त्यानुसार त्यांना अनुदानाची रक्कम वाटप करत आहेत.

विहिरींना लागले पाणी
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन विहिरींसाठी प्रति लाभार्थी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार ४६५ लाभार्थी निवडण्यात आले. यापैकी २६ लाभार्थ्यांनी तर विहिरींची सर्व कामे पूर्ण केली असून, विहिरींना पाणीदेखील बऱ्यापैकी लागले आहे.

योजनेची वैशिट्य

- २ लाख ५० हजार : अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीच्या खोदकामासाठी अनुदान
- १० हजार रु. शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी
- २४ हजार रु. विहिरीत विद्युत पंप घेण्यासाठी
- २५ हजार रु. मागणीनुसार तुषार सिंचन संचासाठीं 

Web Title: 250 wells dug in 4 months of beneficiaries in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.