मराठवाड्यातील २५०० कुटुंबांचे स्थलांतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:07 AM2017-08-17T06:07:37+5:302017-08-17T06:07:42+5:30
पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले
संजय जाधव।
औरंगाबाद : पावसाळ्यातील दोन महिने कोरडे गेल्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग गडद झाले असून पैठण तालुक्यातून जवळपास २५०० कुटुंबांनी रोजी-रोटीच्या शोधात महानगरांकडे स्थलांतर केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत केवळ ३८ टक्के पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सलग चाळीस दिवस पावसाचा थेंबही पडलेला नाही. हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकºयांची आशा ओलावली आहे.
पैठण तालुक्यातील गेवराई (मर्दा) येथील २५ तरुण कामधंद्यासाठी बाहेर पडले असून, यंदा ४० टक्के गावकºयांना ऊसतोडीसाठी जावे लागणार असल्याचे येथील उपसरपंच महंमद पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खादगावमधून
५० तरुणांनी, तर कडेठाण गावातील
८० तरुणांनी मजुरीसाठी गाव सोडले
आहे. आडूळमधील २५० तरुणांनी स्थलांतर केले असून, ३०० महिला रोजंदारी कामासाठी शेंद्रा एमआयडीसी येथे जात असल्याची माहिती सरपंच श्रीपाल राठोड यांनी दिली.
>साडेसात महिन्यांत
५८० शेतकरी आत्महत्या
मराठवाड्यात दुष्काळाचे सावट किती गडद झाले आहे, हे आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरून दिसून येते. १ जानेवारी ते १३ आॅगस्टपर्यंत मराठवाड्यात ५८० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक ११५ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात
७९, जालना ५३, परभणी ७३, हिंगोली ३३, लातूर ५६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७८
शेतकºयांनी स्वत:ला संपविले. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे
५८० जणांनी आपली जीवनयात्रा संपविली असली तरी प्रशासनाने नियमाच्या कसोटीत
४०० प्रकरणेच पात्र ठरविली आहेत.
>पैठण तालुक्यातील हर्षी गावातून २३ जोडपी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत काम शोधण्यासाठी गेले आहेत. तांडा बुदु्रकमधून १० जोडपी नगर येथील कुक्कुटपालन उद्योग,
तर १५ जण चितेगाव येथे गेल्याचे सरपंच ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी सांगितले.
दावरवाडीतून ५० तर नांदरातून ३० जोडप्यांनी गाव सोडले आहे. स्थलांतराची ही आकडेवारी एकट्या पैठण तालुक्यातील आहे.
अशीच परिस्थिती जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात आहे. बीडमधून दरवर्षी ऊसतोड मजुरांचे हंगामी स्थलांतर होते. मात्र, यंदा हंगामापूर्वीच स्थलांतर सुरु झाले.
> ऐन पावसाळ्यात जलसाठे कोरडे
मराठवाड्यातील ७९ मध्यम प्रकल्पात केवळ ४०.०३ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा असून जायकवाडीत ५० टक्के तर माजलगाव धरणात ६ टक्के इतकेच पाणी उपलब्ध आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच वेळ येऊ शकते. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणनिहाय उपयुक्त जलसाठा असा...