मराठवाड्यात २५०० कि.मी. लांबीचे रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 05:34 AM2018-09-22T05:34:22+5:302018-09-22T05:34:25+5:30
औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे.
- राजेश भिसे
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील १३ राज्य महामार्ग व जिल्हा मार्गांची हायब्रीड अॅन्युटी मॉडेल तत्त्वानुसार बांधणी करण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून जवळपास २५०० किलोमीटर लांबीच्या रस्ते बांधणीसाठी ४ हजार ५०० कोटींचा निधी खर्च होणार आहे.
केंद्र सरकारने २०१६ मध्ये हायब्रीड अॅन्युटी मॉडेल ही बांधकाम ठेकेदारांसाठी नवीन पद्धती राष्ट्रीय महामार्गाच्या विविध प्रकल्पांसाठी अंमलात आणली. दोन वर्षे त्यावर राज्यात अभ्यास केला गेला. राज्यात हा प्रयोग हाती घेण्याचे निश्चित करण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. १३ प्रकल्पांच्या संबंधित ठेकेदारांना ‘लेटर आॅफ अॅक्सेपटन्स’ (एलओई) देण्यात आले आहे. हायब्रीड अॅन्युटी मॉडेलला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत असून, यापुढे याच तत्त्वावर राज्यात कामे होतील, असे सूत्रांनी सांगितले.
दोन वर्षांत काम पूर्ण करावे लागेल. राज्य शासन ६० टक्के, बँक कर्ज ३० टक्केआणि ठेकेदारास दहा टक्केरक्कम गुंतवावी लागेल. शासन टप्प्याटप्प्याने ठेकेदारास निधी देईल. दहा वर्षे प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती ठेकेदारास करावी लागेल.
।१३ प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. आणखी एका प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.
- के. टी. पाटील, मुख्य अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग