कुठेही दारू पिणे पडेल महागात; ढाबा चालकास २५ हजार तर, मद्यपींना ५०० रुपये दंड
By राम शिनगारे | Published: September 20, 2022 04:51 PM2022-09-20T16:51:20+5:302022-09-20T16:51:37+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : २९ हजारांचा मुद्देमालही जप्त
औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील हॉटेल शिवगड ढाब्यावर अवैधपणे दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या मालकास २५ हजार रुपये तर सहा मद्यपींना प्रत्येक ५०० रुपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने ठोठावला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक भरत दौंड यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या आदेशानुसार दुय्यम निरीक्षक दौंड यांनी ५ सप्टेंबर रोजी शिवगड ढाब्यावर छापा मारला होता. त्यामध्ये मालक हनुमंत माणिकराव कदम (रा. बीड बायपास, सातारा परिसर) याच्यासह दारु पिण्यास बसलेले संदीप अशोक घुगे (रा. शहाजानपूर, ता. गेवराई, जि. बीड), राजाराम गोविंदराव सोनवणे, धोंडीराम रामराव सोनवणे( दोघेरा. वडाळा वाहेगाव, ता. पैठण), कुणाल प्रताप जाधव (रा. एन ४, सिडको), भरत आसाराम मोरे (रा. पृथ्वीनगर, सातारा परिसर) आणि रामप्रसाद रोहिदास हावळे (रा.सुमित पार्क, देवळाई) यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत २९ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केल. निरीक्षक दौंड यांनी तपास पूर्ण करुन ढाबा मालकासह दारु पिणाऱ्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्याचा निकाल १९ सप्टेंबर रोजी न्यायाधिश एस.व्ही. चरडे यांनी दिला. त्यात मालक कदम यास २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा दंड न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास आणि दारु पिणाऱ्या सहा जणांना प्रत्येकी ५०० रुपये दंड, हा दंड न भरल्यास तीन दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली. ही कामगिरी अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक दौड, ए.जे.कुरेशी, दुय्यम निरीक्षक जी.एस.पवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, जवान विजय मकरंद, ज्ञानेश्वर सांबारे आणि अनिल जायभाये यांनी केली.