जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन ‘गोंधळी’ सभेत २६ विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:05 AM2021-06-16T04:05:46+5:302021-06-16T04:05:46+5:30
-- औरंगाबाद : ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष सभागृहात ऑफलाईन सभा घेण्याच्या सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सोमवारी घेण्यात आलेल्या ...
--
औरंगाबाद : ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष सभागृहात ऑफलाईन सभा घेण्याच्या सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन सभेत भाजप सदस्यांनी निषेध नोंदविला. महिनाभरात ऑफलाईन सभा घेण्याचे आश्वासन मिळाल्यावर सभा सुरू झाली. दहा ते पंधरा जण एकाच कक्षात समोरासमोर बसून भरलेल्या ऑनलाईन गोंधळी सभेत २६ विषय मंजूर करण्यात आले.
ग्रामीण भागात रुग्णसेवेसाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २२ रुग्णवाहिका खरेदीसह २६ हून अधिक विषयांना जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी मान्यता दिली.
सभेत उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सभापती अविनाश गलांडे, किशोर बलांडे, मोनाली राठोड, अनुराधा चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. वैजापूर तालुक्यातील मनूर, गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव, नेवरगाव येथील जुने झालेले जलकुंभ, बाळापूर येथील प्राथमिक शाळेची इमारत तसेच इतर जीर्ण झालेल्या इमारती पाडण्याचा ठराव घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज करण्याकरिता आरोग्याच्या ३१ कोटींच्या पाच प्रस्तावांनाही मान्यता दिली गेली.
सभेमध्ये केशव तायडे, मधुकर वालतुरे, रमेश गायकवाड, जितेंद्र जैस्वाल, प्रकाश चांगुलपाये, छाया अग्रवाल, पुष्पा काळे, रमेश पवार, आदींनी मतदार संघातील प्रश्न उपस्थित केले. सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने सभागृहात घेण्याविषयीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ जि. प. सदस्य मधुकर वालतुरे, किशोर पवार, प्रकाश चांगुलपाये यांनी काळे मास्क लावून निषेध नोंदविला.