मद्यार्क विक्रीच्या नाहरकतीसाठी येणेगूरमधून २६ प्रस्ताव !
By Admin | Published: March 18, 2016 01:24 AM2016-03-18T01:24:20+5:302016-03-18T01:53:20+5:30
येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे बुधवारी ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत मद्यार्क विक्रीच्या दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या नाहरकत
येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे बुधवारी ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत मद्यार्क विक्रीच्या दुकानासाठी आवश्यक असणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राच्या मागणीसाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २६ प्रस्ताव दाखल झाले. या प्रकारामुळे महिलावर्गातून संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.
सातत्याने होत असलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्हा दुष्काळाचा सामना करीत आहे. उमरगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये घागरभर पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. असे असतानाच दुसरीकडे गावोगावी अवैध दारूविक्री फेसाळली आहे. आता तर गावागावातून मद्यार्क विक्रीच्या परवान्यांसाठीच्या अर्जांची संख्या वाढू लागली आहे. याचाच प्रत्यय बुधवारी येणेगूर येथे झालेल्या ग्रामसभेतून आला. सरपंच सुनंदा माळी, उपसरपंच सागर उटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रासभेला सुरूवात झाली. सुरूवातीलाच मद्यार्क विक्रीचे (देशी दारू, बिअरबार, बिअर शॉप) दुकान सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता तब्बल २६ प्रस्ताव दाखल झाले. प्रस्तावांची संख्या लक्षात घेता याबाबत तातडीने कुठलाही निर्णय न घेणेचे पदाधिकाऱ्यांनी पसंत केले. यावेळी उपसरपंच उटगे म्हणाले, या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी महिलांची विशेष ग्रामसभा बोलाविण्यात येईल. या सभेत काय निर्णय होतो? त्यानुसार पुढील कार्यवाही अनुसरण्यात येईल. दरम्यान, उपरोक्त विषयानंतर ग्रामविकास अधिकारी जी. डी. हलबुर्गे यांनी इंदिरा आवास, संगणक आॅपरेटर, रोजगार हमी योजना, पाणी टंचाई आदी विषयांचे वाचन केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.