मराठवाड्यात गुरुवारी कोरोनाचे २६१ नवे रुग्ण; २ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 02:24 PM2020-12-18T14:24:59+5:302020-12-18T14:28:32+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ८९ रुग्ण आढळले.
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी कोरोनाचे नवे २६१ रुग्ण आढळले आहेत. तसेच दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ८९ रुग्ण आढळले. दिवसभरात ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकही मृत्यूची नोंद नाही.
जालना जिल्ह्यातही नव्याने १८ रुग्णांची भर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ३२ नवे रुग्ण आढळले आहेत, तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३८ रुग्ण उपचारानंतर घरीही परतले आहेत. एकूण रुग्णसंख्या २० हजार ९४३ वर पोहोचली आहे तर ५६२ कोरोना बळी ठरले आहेत. जिल्ह्यात आजघडीला २७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच ४५ नवे रुग्ण आढळले तर ३० जणांनी कोरोनावर मात केली. आता एकूण बाधितांची संख्या १६ हजार ३११ एवढी झाली आहे. पैकी १५ हजार ४३७ कोरोनामुक्त झाले असून ५२० जणांचा मृत्यू झाला आहे.
लातूर जिल्ह्यात ४१ नव्या बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे बाधितांचा आलेख २२ हजार ५१७ वर पोहोचला असून, आतापर्यंत २१ हजार ४६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या विविध कोविड केअर सेंटरमध्ये ३८२ जणांवर उपचार सुरू असून, कोरोनाने आतापर्यंत ६६७ जणांचा बळी घेतला आहे.
हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, ४ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत कोविडचे एकूण ३ हजार ४४७ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला जिल्ह्यात एकूण ३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५२ व्यक्तींचा मृत्यू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. १० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार १०० इतकी नोंद झाली. यातील ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला. १५ हजार ४१९ रुग्ण उपचाराअंती ठणठणीत झाले. सध्या १२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
परभणी जिल्ह्यात २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, १२ जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ४२८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ७ हजार ९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.