हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 06:54 PM2021-08-31T18:54:14+5:302021-08-31T18:55:59+5:30

मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले.

26761 cusecs discharge from Hiradpuri dam; Many villages lost contact | हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

हिरडपुरी बंधाऱ्यातून २६७६१ क्युसेस विसर्ग; अनेक गावांचा संपर्क तुटला

googlenewsNext
ठळक मुद्देपैठण तालुक्यात जोरदार पाऊस गोदावरी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण : तालुक्यास पावसाने झोडपून काढले असून वीरभ्रदासह इतर नद्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विरभद्रा नदीला आलेल्या पुरामुळे आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात २६७६१ क्युसेस क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरीला नदीला पुर आला असून नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून  सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पैठण तालुक्यात  हलक्या ते मध्यम पावसास सोमवारी रात्री पासून सुरवात झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून बालानगर, विहामांडवा, आडूळ, पाचोड, नांदर, दावरवाडी, परिसरास पावसाने झोडपून काढले. पुर आल्याने या भागातील नदीनाले एक झाले. तालुक्यातील प्रमुख नदी असलेल्या वीरभ्रदा नदीला महापूर आल्याने विविध ठिकाणचे पुल पाण्याखाली गेले, अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदर येथील पुलावरून पाणी वहात असल्याने नांदरचा संपर्क मंगळवारी सकाळपासून तुटलेला आहे. हार्षी येथील नदीला पुर आल्याने हार्षी व सोनवाडीचा संपर्क तुटला याच प्रमाणे कुतुबखेडा नदीला पुर आल्याने या गावाचाही संपर्क तुटलेला आहे.

हिरडपुरी बंधाऱ्यातून मोठा विसर्ग..... 
नद्या नाल्यांना पुर आल्याने गोदावरी पात्रातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातून आज सकाळी विसर्ग करण्यात आला. हिरडपुरी बंधारा १००% भरत आल्याने सकाळी ८.३० वा. बंधाऱ्याचे चार दरवाजे वर उचलून दरवाजातून २६७६१ क्युसेक्स ईतक्या मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आला या मुळे हिरडपुरी खालील गोदावरी नदीस महापूर आला आहे. दरम्यान आपेगाव बंधारा दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान १००% भरल्याने या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडून १४४५० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आल्याचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. 

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ६७ मंडळात अतिवृष्टीची नोंद, अनेक गावांचा संपर्क तुटला

नागरिकांना सावधानतेचा इशारा.... 
हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला पुर आला असून नदी काठच्या गावांना सावधानतेचा ईशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला आहे. गोदाकाठच्या गावात तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल यांना गावात राहण्या बाबत सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहेत. 

जायकवाडी धरणात २४१३ क्युसेस आवक...... 
जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे २४१३ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा ४२.२९% झाला होता. धरणाच्या स्थानिक पाणलोटक्षेत्रात पाऊस सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यातून सध्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. गेल्या २४ तासात ६ दलघमी जलसाठ्यात वाढ झाली असून १ जून पासून धरणात ३३० दलघमी (११.६५ टिएमसी) ची वाढ झाली आहे. सध्या धरणात १६५६.१६२ (५८.४८ टिएमसी) एकूण जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ९१८.०५६ दलघमी (३२.४१ टिएमसी) ईतका आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथून अद्याप अपेक्षित आवक झालेली नाही. सध्या नाशिक जिल्ह्यातील येणारे पाणी बंद आहे.

Web Title: 26761 cusecs discharge from Hiradpuri dam; Many villages lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.