२७९ गावांमध्ये अशुद्ध पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:39 AM2017-08-01T00:39:26+5:302017-08-01T00:39:26+5:30
बीड जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडरच नसल्याने ग्रामीण जनतेला अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. शासनाकडून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी मोठा निधी उपबलब्ध होत असतानाही ग्रामीण पातळीवर उदासिनतेमुळे विविध आजारांचा सामना जनतेला करावा लागत आहे.
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत आढावा घेतल्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. गावपातळीवरील निवडणूक जिंकण्यासाठी विविध फंडे राबविणारे लोकप्रतिनिधी गावकारभारी झाल्यानंतर मात्र स्थानिक राजकारणात व्यस्त असल्याचे दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता, पाणी, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने समस्यांमध्ये भर पडत राहिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ब्लिचिंग पावडर नसल्याची बाब जिल्हा परिषदेच्या बैठकीत, समन्वय समितीच्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वेळोवेळी आली. तसेच ही बाब ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्र्यांच्याही निदर्शनास आलेली आहे. त्यानुसार गटविकास अधिकाºयांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना दिल्या तरीही अद्याप उपाययोजना कोठेही झालेली नाही.
ब्लिचिंग पावडर उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींची धडपड दिसली नाही. या दुर्लक्षतेमुळे ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. परिणामी विविध आजार बळावल्याने खाजगी व सरकारी रुग्णालयांचा ग्रामस्थांना आधार घ्यावा लागत आहे. गोदाकाठच्या गावांमध्ये दूषित पाण्याचे प्रमाण जास्त आहे.
जिल्ह्यात नियमितपणे पाणी नमुने तपासले जात आहेत. पावसाळ्यात पाणी शुद्धीकरण आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडर उपलब्ध करुन वापर आणि शुद्ध पाणी पुरवठ्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजार टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत उपाययोजना केल्या पाहिजेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.