जुगार खेळणारे २७ जण जेरबंद
By Admin | Published: February 17, 2015 12:09 AM2015-02-17T00:09:49+5:302015-02-17T00:38:03+5:30
जालना : शहरातील बसस्थानकाजवळ मंमादेवी लॉजच्या गच्चीवर चालणाऱ्या टोकन जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी छापा मारून पोलिसांनी २ लाखांचे टोकन, रोख ७५ हजार रुपये, ३१ मोबाईल व ६ दुचाकी जप्त केल्या.
जालना : शहरातील बसस्थानकाजवळ मंमादेवी लॉजच्या गच्चीवर चालणाऱ्या टोकन जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी छापा मारून पोलिसांनी २ लाखांचे टोकन, रोख ७५ हजार रुपये, ३१ मोबाईल व ६ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
मध्यवस्तीत बसस्थानकाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून लॉजच्या गच्चीवर जुगाराचा क्लब चालत असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांना मिळाली. सदर बाजार पोलिसांसह गेडाम यांनी या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी टोकन घेऊन पत्त्यांचा जुगार सुरू होता. पोलिस आल्याचे कळताच काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी लॉजच्या परिसरात चोहोबाजुंनी सापळा रचल्याने एकाही आरोपीला पळ काढता आला नाही.
या छाप्यात २७ आरोपींना पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. कारवाईच्या वेळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गेडाम म्हणाले, टोकन जुगार मुंबईसारख्या शहरांमध्ये चालतो. तसाच जुगार या ठिकाणी सुरू होता. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह व अपर अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही हा छापा मारून कारवाई केली. शहरात आणखी कोठे या प्रकारचा जुगार सुरू आहे का, याची चौकशी सुरू असल्याचे गेडाम यांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये काही प्रतिष्ठितांचाही समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)
सोमवारी सायंकाळी पोलिसांची चार वाहने बसस्थानक परिसरात अचानक दाखल झाली. त्यानंतर कारवाई सुरू असताना बघ्यांनी लॉजसमोर गर्दी केली. तेथे दुचाकी वाहनांच्या पार्किंगजवळच जमाव जमला होता. तो पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे काहीजण वाहनांवर आदळून किरकोळ जखमी झाले.