जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 07:45 PM2022-09-17T19:45:56+5:302022-09-17T19:46:32+5:30
आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरण काठोकाठ भरलेले असताना (९८.२४%) नाशिक व अहमदनगर जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या मुक्त पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी जायकवाडी धरणात १,२०, ००० क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाली. यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह सर्व २७ दरवाजे ४ फूटाने वर उचलून धरणातून होणारा विसर्ग १ लाख १३ हजार १८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला.
आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद ,जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग दिड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली.
शनिवारी दुपारनंतर गोदावरी नदी ४६००० व प्रवरा नदी ५७००० क्युसेक्सने भरून जायकवाडी धरणात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे दुपारी पाच नंतर जायकवाडीतून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून सायंकाळी सात वाजेपर्यंत १,१३,१८४ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. यामुळे पैठण शहरातील नदीकाठचा सखल भाग, मोक्षघाट पाण्याखाली आले. ग्रामीण भागातील गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या नाले व ओढ्यातून पाणी उलटे प्रवाही झाले.
दरम्यान, विसर्ग वाढविण्यात आला तर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातील भंडारदरा ५५३८, नीळवंडे १०९६०, ओझरवेअर २२१५१ व मुळा धरणातून १५००० क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला यामुळे प्रवरा नदीस महापूर ( ५७८५४ क्युसेक्स) आला असून हे पाणी गतीने जायकवाडी धरणात दाखल होत होते. नाशिक जिल्ह्यात थोडा पावसाचा जोर कमी झाल्याने दारणा ५९२४, कडवा ५००१, गंगापूर १६०८,पालखेड, ६३९४ व नांदुर मधमेश्वर वेअर मधून ३३५७६ क्युसेक्स विसर्ग तेथील धरण समुहातून करण्यात आले. परंतु नाशिक ते पैठण दरम्यान मुक्त पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरीसही (४६००० क्युसेक्स) पुर आला आहे दोन्ही नद्यांचे पाणी जायकवाडीत दाखल होण्यास प्रारंभ झाल्याने जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग करण्याचा निर्णय शनिवारी दुपारनंतर घेण्यात आला.
धरण भरून ठेवण्याचा अट्टाहास.....
दिड लाख क्युसेक्स व त्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यास पैठण शहरासह तालुक्यातील गोदाकाठच्या गावास पुराचा फटका बसतो. पुरनियंत्रणासाठी धरणात जागा ठेवावी अशी मागणी पैठणकर सुरवातीपासून करत आले आहेत. परंतु केवळ धरण १००% भरून ठेवण्याच्या जायकवाडी प्रशासनाच्या अट्टाहासातून पैठण शहरावर पुराची टांगती तलवार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे पत्र समाजमाध्यमावर आल्यानंतर शहरातील व्यापारी धास्तावले. दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे नियोजन व्यापाऱ्यांचे सुरू होते. दरम्यान, परिस्थिती लक्षात घेता नियंत्रित विसर्ग करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री अनील पटेल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहीया, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, दत्ता गोर्डे, तुषार पाटील आदींनी केले आहे.