२७ टक्के विद्यार्थ्यांची एमपीएससीच्या परीक्षेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:02 AM2021-09-05T04:02:02+5:302021-09-05T04:02:02+5:30
--- औरंगाबाद : ‘कसा गेला पेपर, सोप्पा होता ना?’ असे मित्र नातेवाइकांचे परीक्षा केंद्राबाहेर पडताच प्रश्न होते, तर परीक्षार्थींकडून ...
---
औरंगाबाद : ‘कसा गेला पेपर, सोप्पा होता ना?’ असे मित्र नातेवाइकांचे परीक्षा केंद्राबाहेर पडताच प्रश्न होते, तर परीक्षार्थींकडून ‘पेपर सोप्पा होता, थोडा अवघड गेला’ अशा स्वरूपाची उत्तरे ऐकायला मिळाली. कोरोनामुळे पाच वेळा पुढे ढकललेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२०’ शनिवारी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान पार पडली. शहरातील ६० केंद्रांवर १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर तब्बल २७ टक्के विद्यार्थी गैरहजर होते.
विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, कक्ष सहाय्यक पदांसाठी झालेल्या परीक्षेला अर्ज भरलेल्या १९ हजार ६८० उमेदवारांची बैठक व्यवस्था होती. त्यापैकी १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पाच हजार ४५४ विद्यार्थी गैरहजर राहिले.
विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी बाह्यस्त्रोताद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. सकाळी ९.३० ते १०.३० वाजता सॅनिटायझरचा फवारा हातावर मारून थर्मल गनने विद्यार्थ्यांची तपासणी केल्या गेली. तसेच विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, ग्लोज या साहित्याचे पॅकेट वाटप केले. १०.३० वाजेनंतर प्रवेश नव्हता. स्पष्ट सूचना आणि नियोजनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अडचणी आल्या नाहीत. केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तही होता. परीक्षेसाठी एक हजार ९६८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले होते.
---
- ६० परीक्षा केंद्र
- १९,६६३ विद्यार्थ्यांचे अर्ज
- १४,२०९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
- ५,४५४ विद्यार्थी राहिले गैरहजर
- १,९६८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची निगराणी
---
परीक्षार्थी म्हणतात...
माझा एमपीएससीचा पहिलाच अटेम्ट होता. पेपर छान सोडवला. परीक्षा लांबत गेल्या. खूप दिवस प्रतीक्षा केली. आता निकाल लवकर लागावा.
- डाॅ. स्वाती पवार, परीक्षार्थी
--
मी फुलंब्री पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. यापूर्वी दोनवेळा परीक्षा दिली होती. तयारी सुरू होती. परीक्षा लांबल्याने अभ्यासाला वेळ मिळाला. मी आणि पतीनेही परीक्षा दिली.
- अनिता बनसोडे, परीक्षार्थी
---
सर्वच विषयांचा समतोल साधणारा पेपर होता. छान सोडवला. आता निकालाची प्रतीक्षा आहे. चांगल्या नियोजनामुळे अडचण आली नाही.
- विशाल गिरी, परीक्षार्थी
---
खूप सोपा पेपर होता. निकालही चांगला येईल अशी अपेक्षा आहे. परीक्षा लांबल्याने अभ्यासाला भरपूर वेळ मिळाला. त्यामुळे या परीक्षेचा निकालही उंचावण्याची शक्यता आहे.
- श्रुती तुगडे, परीक्षार्थी
---
अनेकवेळा परीक्षा पुढे ढकलल्याने अनेक जणांचे वय निघून गेले. त्यामुळे गैरहजेरीचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. आज पेपर झाला तो चांगला गेला. निकाल लवकर लागावा.
- विक्रम पुरी, परीक्षार्थी
---
(सर्वांचे फोटो आहेत)