२७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:26 AM2018-06-20T01:26:03+5:302018-06-20T01:26:34+5:30
लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लाभक्षेत्रातील सिंचन आणि बिगर सिंचन मिळून तब्बल २७१ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. यामध्ये सिंचनाची १०० कोटी, तर पाणीपुरवठा योजनांची तब्बल १७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण(कडा)अंतर्गत धरणांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामध्ये पाणी सोडण्यापासून ते पाणीपट्टी वसुलीची कामे होतात. गेल्या काही वर्षांत केवळ चालू पाणीपट्टीकडे कल आहे. जुन्या थकबाकीकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. मोठे, मध्यम आणि लघु अशा प्रकल्पांद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच राहत आहे. दरवर्षी मार्च अखेरीस वसुलीवर अधिक भर देण्यात येतो. गतवर्षी ४० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये ९५ टक्के म्हणजे ३८ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यामध्ये अनेक कारणांमुळे जुनी थकबाकी वसूल होत नसल्याची परिस्थिती आहे. चालू पाणीपट्टी वसुलीवरच भर दिला जात आहे. उद्योग आणि घरगुती वापरासाठी दिलेल्या पाण्याच्या शुल्काची (पाणीपट्टी) तुलनेत बरी आहे; परंतु सिंचनासाठीची पाणीपट्टी कमी प्रमाणात वसूल होत आहे. ‘कडा’ कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद मनपाकडे ३१ मे अखेर तब्बल ६ कोटी १५ लाख ७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे. याबरोबर औद्योगिक वापरापोटी २ कोटी १२ लाख १९ हजार रुपयांची थकबाकी आहे. वाळूज एमआयडीसीकडे १२ कोटी ४७ लाख ४७ हजार रुपये पाणीपट्टी थकीत आहे.