मंत्रिमंडळाच्या दिमतीला २७५ वाहने मागवणार
By Admin | Published: October 2, 2016 01:19 AM2016-10-02T01:19:55+5:302016-10-02T01:22:20+5:30
औरंगाबाद : येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरात येणारे मंत्री, सचिव व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे.
औरंगाबाद : येत्या ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने शहरात येणारे मंत्री, सचिव व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी १३ जिल्ह्यांतून २७५ वाहने मागवून घेण्यात येणार आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तालयात रंगरंगोटीला वेग आलेला आहे. तसेच ज्या दालनात बैठक होणार आहे, तेथील कार्पेट बदलण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांच्या दालनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा आहेत. समोरच्याच भिंतीवर राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. मुख्य प्रशासकीय इमारतीचीही रंगरंगोटी सुरू आहे. मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये असेल. तेथेही साफसफाई, पडदे, कार्पेट बदलण्याचे काम सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीसाठी आयुक्तालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती आता सुरू झाली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतले जातील याकडे उभ्या मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्याच्या मागील बैठकांमध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींची एकत्रित गोळाबेरीज करून पॅकेज दिले गेले. यावेळी तसे काही घडून मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेज जाहीर केले जाते काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी केले जाणारे निर्णय प्रशासकीय स्वरुपाचेही असतील, असे एका सूत्राने सांगितले. औरंगाबाद शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतच नाही. जी पूर्वी होती, ती १९८२ साली औरंगाबाद खंडपीठासाठी देण्यात आली होती. तेव्हापासून अशी इमारत नसल्याने मोठी गैरसोयच निर्माण झाली आहे. नव्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अगत्याने विचार करावा, असा आग्रह वाढत आहे.