राज्यात २८ हजार ३५९ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 06:00 AM2020-08-18T06:00:55+5:302020-08-18T06:01:29+5:30
‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.
औरंगाबाद : राज्यात शहरांना जे जमले नाही ते गावकऱ्यांनी करून दाखवले. राज्यातील एकूण ४३ हजार २५ गावांपैकी तब्बल २८ हजार ३५९ गावांनी ‘कोरोना’ला वेशीच्या आत येऊच दिले नाही. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली असताना या गावांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. सर्वाधिक कोरोनामुक्त गावे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आहेत. ‘लोकमत’च्या राज्यभरातील हॅलो टीमने मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे.
>कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनामुक्त गावे?
कोरोनाचा अद्याप शिरकाव न झालेली १,००० पेक्षा जास्त गावे असलेल्या जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अमरावती, नांदेड, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, बीड, रत्नागिरी, बुलडाणा आणि जळगाव यांचा क्रमांक लागतो.
>या गावांनी काय केले?
परजिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतरच गावात प्रवेश.
वेशीबाहेर सॅनिटायझर आणि हात धुण्यासाठी व्यवस्था.
बाहेरगावाहून भाजीपाल्यासह इतर वस्तू घेऊन येण्यास प्रतिबंध.
बाहेरगावातील नातेवाईकांसह सर्वांनाच गावबंदी. काही कारणास्तव बाहेरील व्यक्ती आलीच, तर तिच्या सर्व वस्तू निर्जंतुक आणि सॅनिटाईझ करून गावात प्रवेश.
अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच गावाबाहेर जाण्यास परवानगी. बियाणे-खत खरेदीसाठी चार-पाच जणांचा ग्रुप सर्व खबरदारीसह शहराच्या ठिकाणी जाणार आणि आल्यानंतर अंघोळीसह कपडे धुणे आदी काळजी घेणार. काही गावांनी गावातच केली व्यवस्था.
अतिजोखमीचे रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला आदींचे सर्वेक्षण करून आरोग्य विभागामार्फत गावातच उपचार.
अंगणवाडी सेविका, दक्षता समिती आणि ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर निगराणी.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन. गर्दी करण्यास बंदी. आठवडी बाजार बंद. सौम्य लक्षणे आढळताच होम-क्वारंटाईन.
वेळोवेळी गावात जंतुनाशक फवारणी. स्वच्छता मोहीम.
गावात उत्पादित दूध-भाजीपाल्याचे गावातच वितरण. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप.