'समाजासाठी बलिदान समर्पित', मराठा आरक्षणसाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 21:50 IST2025-02-03T21:50:02+5:302025-02-03T21:50:45+5:30
विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविली.

'समाजासाठी बलिदान समर्पित', मराठा आरक्षणसाठी 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या
फुलंब्री : तालुक्यातील पाल गावातील 28 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. रवींद्र बाबुराव जाधव(वय 28 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रवींद्र जाधव याने सोमवारी दुपारी 3 वाजेच्यादरम्यान पाल ते आडगाव दरम्यान शेतातील घरात विषारी औषध घेतले अन् तिथेच कोसळला. कुटुंबातील लोक सायंकाळी शेतात आले असता तो पडलेला आढळून आला. त्याला प्रथम छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर पाल येथे रात्री 9 वाजता तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र जाधव हा पाथ्री येथील महावितरण कार्यालयात ऑपेटर म्हणून काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
आत्महत्या पूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली
रवींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामध्ये 'जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा...मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे पाटील लढा देत आहेत, परंतु आरक्षण मिळत नाही. मी आज माझे जीवन संपवित आहे. समाजाला माझे जीवन समर्पित करीत आहे,' असे चिठ्ठीत लिहून ठेवल्याचा दावा त्याच्या निकटवर्तीयांनी केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश काळे करीत आहेत.