जिल्ह्यात २८१ टँकरने पाणी
By Admin | Published: May 2, 2016 11:56 PM2016-05-02T23:56:21+5:302016-05-03T00:04:27+5:30
लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़
तीव्र टंचाई : दहा तालुक्यात ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण
लातूर : लातूर शहरासह जिल्हा भरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत़ जिल्ह्यातील एकूण ७९१ गावातून १३०० विहीरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ टंचाईग्रस्त २५४ वाढी तांड्यावर २८१ टँकरने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़
लातूर जिल्ह्यातील जळकोट उदगीर देवणी अहमदपूर आदी तालुक्यातील डोंगराळ भागातील खेड्या-पाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जळकोट तालुक्यातील वाढी तांड्यावर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष आहे़ एकूण १० तालुक्यातील ७९१ गावांमध्ये १ हजार ३०० विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे़ तर जिल्ह्यातील २१० गावे आणि ४४ वाड्यांवर एकूण २५४ ठिकाणी २८१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ यामध्ये लातूर तालुका ३१ गावे आणि १ वाड्यावर ४२ टँकर तर ११० गावात १९२ विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे़ औसा तालुक्यातील २१ गावे आणि २ वाड्यामध्ये २४ टँकरद्वारे, ११६ गावात १९३ विहीरींचे अधिग्रहण, रेणापूर तालुक्यातील १६ गावे आणि ४ वाड्यामध्ये २१ टँकर आणि ७३ गावाामध्ये १०४ विहीरींचे अधिग्रहण, उदगीर तालुक्यातील ३१ गावे व १४ वाड्यात ४५ टँकरदने सध्याला पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील ७७ गावांसाठी १२१ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ अहमदपूर तालुक्यातील ३१ गावे आणि ९ वाड्यांवर ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ याच तालुक्यातील १०२ गावांसाठी १४५ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे़ चाकूर तालुक्यातील २५ गावे १ वाड्यामध्ये २८ टँकर तर ८३ गावांसाठी ११७ विहीरींचे अधिग्रहण, देवणी तालुक्यातील १३ गावे आणि ३ वाड्या १३ टँकरद्वारे तर ३४ गावात ५४ विहीरींचे अधिग्रहण, जळकोट तालुक्यातील २० गावे आणि ७ वाड्यामध्ये २६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़
जळकोट तालुक्यातील ३८ गावात ५३ विहीरींचे अधिग्रहण, निलंगा तालुक्यातील १६ गावे आणि ३ वाड्यांमध्ये २५ टँकरने पाणीपुरवठा तर १२१ गावांसाठी २५७ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील ६ गावांसाठी ६ टँकरने सध्याला पाणीपरुवठा केला जात आहे़ पाणीटंचाई लक्षात घेता तालुक्यातील ३७ गावांसाठी ६४ विहीरींचे अधिग्रहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़
उपाययोजना : १६७ नव्या विंधन विहीरी़़़
जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५ -१६ अंतर्गत लातूर जिल्हा परीषदेच्या वतीने नळ योजना विशेष दुरुस्तीच्या २२ योजना तर नविन १६७ विंधन विहीरी, १० विशेष दुरुस्ती, २५ पुरक नळयोजना, ८४ विहीरींचे खोलीकरण व गाळ काढणे आदी उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत़