जिल्ह्यात २९०० एसटी कर्मचारी वेतनाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:04 AM2021-06-20T04:04:36+5:302021-06-20T04:04:36+5:30
औरंगाबाद : जून महिन्याची २० तारीख आली, तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०० ...
औरंगाबाद : जून महिन्याची २० तारीख आली, तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अद्यापही झालेले नाही. जिल्ह्यातील तब्बल २ हजार ९०० कर्मचारी वेतनाविना आहेत. एक-एक दिवस उधारीवर काढण्याची वेळ ओढवत आहे. पण आता उधारीही कोणी देत नसल्याची व्यथा एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.
कोरोना काळात गेल्या दीड वर्षांत वारंवार वेतनाच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जून महिना संपण्यास १० दिवस उरले आहेत. परंतु अद्यापही मे महिन्याचे वेतन झाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वेतनाअभावी कोणाचे घरभाडे थकले आहे, तर कोणाकडे किराणा दुकानदारांची थकबाकी वाढत आहे. सहकारी कर्मचाऱ्यांकडूनही उधार पैसे मिळत नसल्याची स्थिती झाली आहे. कारण कोणाचेच वेतन झालेले नाही.
आधीच कमी पगार आहे. त्यात तो वेळेवर मिळत नाही. कसेबसे दिवस काढावे लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले.
आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच परिवहनमंत्र्यांनी दिली होती. यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु ही मदत कुठे आहे, असा सवाल कर्मचारी उपस्थित करीत आहे.
लवकर वेतन करावे
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ७ तारखेपर्यंत वेतन होते. परंतु अद्यापही वेतन झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवत आहे. वेतन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा.
- मकरंद कुलकर्णी, विभागीय सचिव, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन
---
जिल्ह्यातील एकूण कर्मचारी-२,९००
वाहक-९३१
चालक-१,२१३