घाटी रुग्णालयात ३ बाळे दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:11 AM2017-08-22T01:11:52+5:302017-08-22T01:11:52+5:30
घाटी रुग्णालयात एकाच दिवशी तीन बाळांचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात एकाच दिवशी तीन बाळांचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २१) समोर आली. यामध्ये प्रसूतीनंतर बाळाच्या मृत्यूची माहिती देण्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप एका महिलेच्या नातेवाइकांनी केला. रविवारी रात्री प्रसूती झाली; परंतु मृत्यूची माहिती थेट सोमवारी सकाळी देऊन बाळाचा मृतदेह ताब्यात देण्यात आल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात माया मगरे (रा. ब्रिजवाडी), पूजा बखळे (रा. डोंगरगाव, ता. पैठण) आणि अर्चना मुंडे (रा. धावणी मोहल्ला) यांना प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. या तिघींचीही रविवारी नार्मल प्रसूती झाली; परंतु तिन्ही बाळांचा गर्भातच मृत्यू झाला होता.
प्रसूतीसाठी रुग्णालयात त्या उशिराने दाखल झाल्या होत्या, त्यामुळे बाळांचा मृत्यू गर्भातच झाला. मृत बाळ जन्माला आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
सायंकाळी उशिरा प्रसूती झाल्यानंतर जर एखाद्या मृत बाळाचा जन्म झाला तर नियमानुसार नातेवाइकांच्या ताब्यात सकाळीच दिला जातो.
रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी गैरसोय होऊ नये, म्हणून ही काळजी घेतली जाते. त्यामुळे तिन्ही बाळांचा मृतदेह सोमवारी सकाळी ताब्यात देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.